स्टार प्रचारक गाजवणार दिंडोरीचे रण

स्टार प्रचारक गाजवणार दिंडोरीचे रण

लोकसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याने युती व आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या सभांना उमेदवारांची मागणी वाढली आहे. दिंडोरी लोकसभेसाठी चौथ्या टप्पात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. यामुळे तिसर्‍या टप्प्यातील मतदान होताच, राज्यातील सर्व स्टार प्रचारक दिंडोरीचे रण गाजवणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या प्रचारयुद्ध रंगले आहे. हे दोन्ही नेते दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत. पवार यांची रविवारी (ता. २१) नांदगाव येथे प्रचारसभा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (दि. २२) पिंपळगाव बसवंत येथे सभा होणार आहे. मोदींच्या प्रचार सभेसाठी मोठ्या प्रमाणात नियोजन बैठका घेतल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जयकुमार रावल, पंकजा मुंडे यांसारख्या २० प्रचारकांची यादी भाजपने तयार केली आहे. तसेच आघाडीने मतदानापूर्वी दहा दिवस आधी प्रत्येक नेत्यांची सभा आयोजित करून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रनणिती आखली आहे. सकाळी ८ ते दुपारी २ आणि २ ते रात्री १० या वेळेत सभांचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (ता. २५) निफाड येथे सभा होणार आहेत. शुक्रवारी (ता. २६) धनंजय मुंडे यांची चांदवड येथे सभा होणार असून आमदार छगन भुजबळ येवला, नांदगावसह निफाड, कळवण व दिंडोरी येथे सभा घेणार आहेत. मतदानापूर्वी दहा दिवस उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये प्रचारयुद्ध रंगणार असल्यामुळे प्रत्येक दिवशी एक सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे.

उमेदवारांना पावसाची धास्ती

जिल्ह्यात रविवार (ता. १४) पासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना अडचणी येत आहेत. गारपीट व सोसाट्याच्या वार्‍यासोबत पाऊस कोसळत असल्याने प्रचारसभा निर्विघ्न कशा पार पडतील, याची उमेदवारांचा चिंता आहे. खुल्या जागेवर सभा घेण्यापेक्षा बंदिस्त हॉलमधे सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे.

First Published on: April 17, 2019 8:35 AM
Exit mobile version