उत्पादन शुल्क विभागाने पकडला दीड कोटींचा मद्यसाठा; हरियाणातील पाच जणांना अटक

उत्पादन शुल्क विभागाने पकडला दीड कोटींचा मद्यसाठा; हरियाणातील पाच जणांना अटक

जप्त केलेल्या मद्यसाठ्यासह अटकेतील संशयितांना ताब्यात घेतलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी.

भारताबाहेर विक्रीसाठी तयार करण्यात आलेले मद्य चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जाणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव, धुळ्याचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वतः पोहोचत धुळे-औरंगाबाद रोडवर सापळा रचला. यादरम्यान चोरटी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला पायलेटिंग करणाऱ्या ब्रिझा कारला ताब्यात घेतले. या कारच्या चालकाने सर्व कबुली देताच पथकाने पाठीमागून येणाऱ्या संशयीत कंटेनरला थांबवून चालकाला ताब्यात घेतले. त्यानेही कबुली दिल्यानंतर पथकाने दोन्ही गाड्यांसह सर्व संशयितांना मालेगावातील कार्यालयात आणून मद्यसाठ्याची तपासणी केली. त्यातही संशयितांनी दिलेली माहिती व मद्यसाठ्यावरील छापील माहितीत तफावत आढळून आली. याप्रकरणी पथकाने पाच जणांना अटक केली असून, त्यातील एक अल्पवयीन असल्याचा संशय आहे. अन्य चारही आरोपांनी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कंटेनरमध्ये तब्बल १८ हजार बाटल्या

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत कंटेनरमध्ये फेमस हॉर्स प्रिमीयम व्हिस्कीच्या ७५० मिलीलिटर क्षमतेच्या १८ हजार बाटल्या जप्त केल्या. तर, ओल्ड अँड गोल्ड एज ओल्ड माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिलीलिटर क्षमतेच्या २४ बाटल्या पथकाला आढळून आल्या.

श्रीलंकेच्या नावाने बनवेगिरी

परदेशात मद्य पाठवायचे असेल तर कुठलेही कर आकारले जात नाहीत. याचाच गैरफायदा घेत संशयितांनी संपूर्ण माल श्रीलंकेत निर्यात करण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातच विक्रीचा घाट घातला होता. – प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त

First Published on: February 6, 2019 9:35 PM
Exit mobile version