मनमाड-नाशिक-इगतपुरी नवी रेल्वे लाईन कसार्‍यापर्यंत न्या

मनमाड-नाशिक-इगतपुरी नवी रेल्वे लाईन कसार्‍यापर्यंत न्या

 मध्य रेल्वेकडून मनमाड – इगतपुरी दरम्यान टाकण्यात येणारी नवीन रेल्वे लाईनची लांबी वाढवून ती कसारा स्टेशनपर्यंत केल्यास या मार्गावर लागणार्‍या वेळेची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा पैसा देखील वाचणार आहे अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे. यामुळे नाशिक – मुंबई लोकल सेवा सुरु होण्याच्या मार्ग देखील मोकळा होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

दिल्ली येथे सुरु असलेल्या अधिवेशकाळात खासदार गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेवून या रेल्वे लाईन संदर्भात चर्चा केली. मनमाड – नाशिक – इगतपुरी दरम्यान नव्याने रेल्वे लाईन टाकण्यात येत आहे. तसेच कल्याण ते कसारा या दरम्यान देखील रेल्वेकडून एक नवी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. नाशिक ते मुंबई रेल्वेने जवळपास १८० किलोमीटर अंतर आहे. मात्र कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या घाट, डोंगर दर्‍यांच्या रस्त्यात रेल्वेला वाहतुकीला अनेक अडचणी येतात. यासाठी कसारा ते इगतपुरी दरम्यान रेल्वे इंजिनला अतिरिक्त इंजिन (बँकर) लावले जातात. त्यामुळे घाटातील चढाव पार करण्यात येतो. मात्र यामुळे वेळ व रेल्वेचा पैसा खर्च होतो. आता रेल्वे मार्ग नव्याने जोडणी करणे सोयीचे झाले आहे. रेल्वे मार्गावर टनेल बनविणे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे सोयीचे झाले आहे. त्यामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान बोगदा करणे, त्याचा डायमीटर वाढविणे तसेच उंचावरुन वेगवाने रेल्वे वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान नव्याने रेल्वे लाईनची जोडणी करुन नाशिक – मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करता येणार आहे. याबाबत दानवे यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच रेल्वे मंत्रालयाच्या एका विशेष पथकाकडून कसारा ते इगतपुरी दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे

घाट रस्त्याचा अडथळा दूर होणार

मनमाड – इगतपुरी दरम्यान नव्याने टाकण्यात येणारी रेल्वे लाईन थेट कसारा पर्यंत नेल्यास या मार्गावर लागणार्‍या वेळेची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा पैसादेखील वाचणार आहे. सद्यस्थितीत रेल्वेला इगतपुरी – कसारा दरम्यान बँकर लावले जातात तरीदेखील गाडी घाटात थांबत थांबत जाते. या नव्या रेल्वे लाईनमुळे बोगद्यांचा डायमीटर वाढविला जाणार आहे. इगतपुरी – कसारा दरम्यानचा घाट रस्त्यात ही रेल्वे लाईन टाकल्यामुळे वेगाने रेल्वे प्रवास होणे शक्य होणार असून नाशिक – मुंबई दरम्यान लोकल सेवा देखील यामुळे सुरु करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या नव्या रेल्वे लाईनमुळे नाशिक-मुंबई दरम्यान रेल्वे प्रवासाला लागणार्‍या वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. इगतपुरी – कसारा दरम्यान रेल्वेला लागणार्‍या वेळ वाचल्यामुळे नाशिक- मुंबई ही दोन मुख्य शहर अजुन जवळ येणार असून त्यामुळे विकासाला अधिकाधिक चालना मिळेल.
                                                         – हेमंत गोडसे, खासदार

First Published on: July 31, 2021 6:53 PM
Exit mobile version