नाशिकमध्ये आर्थिक दुर्बलांसाठी दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’

नाशिकमध्ये आर्थिक दुर्बलांसाठी दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’

नाशकात दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’

शहरातील नागरिकांना विशेषत: झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून राज्य शासन दिल्लीच्या धर्तीवर ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ प्रकल्प नाशिकमध्ये सुरु करीत असल्याची महत्वपूर्ण घोषणा आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. २०) नाशिकमध्ये केली. साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आरोग्य आणि वैद्यकीय विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महापालिकेने राज्याच्या आरोग्य विभागाकडे अकरा केंद्रांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यातील दहा केंद्रांना शिंदे यांनी मंजूरी दिली.

अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र झोपडपट्ट्यांपासून दूर आहेत. संबंधित झोपडपट्ट्यांमधील रहिवाशी आजारी पडल्यास त्यांना या केंद्रांपर्यंत पोहचणे जिकरीचे जाते. या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी परिसरातच थेट आरोग्य सेवा पुरविल्यास त्याचा फायदा रहिवाशांना होऊ शकतो या विचाराने ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रथमत: दिल्लीत ‘मोहल्ला क्लिनिक’ नावाने सुरु झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शिवसेनेने तो ‘आपला दवाखाना’ नावाने महाराष्ट्रात सुरु केला. मुंबई महापालिकेत सध्या हा प्रकल्प सुरु असून त्यात वैद्यकीय उपचार विनामुल्य केले जातात.

चार कोटींचा खर्च अपेक्षित

दवाखाना उभारणीचा खर्च, त्या ठिकाणी लागणारी उपकरणे, साहित्य आणि जागा भाडयाने घेणे, हा खर्च संबंधित संस्थेला करावा लागणार आहे. एक ‘आपला दवाखाना’ सुरू करायचा असेल तर त्याच्या निर्मितीसाठी ४३ लाख ४७ हजार रुपये खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च नियुक्त संस्थेमार्फत केला जाणार आहे. म्हणजे नाशिक महापालिकेला सुमारे ४ कोटी ३४ लाख ७० हजार इतका खर्च येऊ शकतो.

दुष्टिक्षेपात

First Published on: July 20, 2019 8:17 PM
Exit mobile version