पहिला बुद्धिस्ट विवाह करणार्‍या सुमनताई पवार

पहिला बुद्धिस्ट विवाह करणार्‍या सुमनताई पवार

Gray Background, Paper, Flooring, Backgrounds, White Background

सामाजिक बांधिलकी असणारे व डॉ. बाबासाहेबांसोबत काम करणार्‍या आर. आर. पवार यांची पहिली कन्या सुमन रामचंद्र पवार यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३६ सालचा. तीन भावंडांच्या पाठची. वडीलांकडून समाजकार्याचे बाळकडू मिळालेल्या सुमनताईंना समाजाला वाहून घेतलेले डॉ. विष्णुकुमार कर्डक यांसारखे उदात्त जोडीदार मिळाल्याने त्यांना मोठे समाजकार्य उभे करता आले. त्यांच्या घरी येणारे गरजू कधीही हताश होऊन गेले नाहीत.

सुमनताईंना लाभलेले डॉ. बाबासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्या सेवेची संधी यामुळे सर्वांना त्यांच्याविषयी आदर होता. १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरला बाबासाहेबांसोबत, डॉ.विष्णूकुमार कर्डक व सुमन रामचंद्र पवार (सुमनताई कर्डक) यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व त्यानंतर डॉ. कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब यांना पत्राद्वारे बुद्ध धर्मातील लग्नविधी कसा करावा, याची विचारणा केली आणि बाबासाहेबांनी त्यांना बुद्ध धम्मातील लग्नविधीबद्दल रीतसर पत्राचे उत्तर दिले व त्यानुसार आपल्या समाजातील बुद्ध धम्माच्या दीक्षेनंतर पहिला बुद्धिस्ट विवाह हा डॉ. विष्णूकुमार कर्डक आणि सुमन रामचंद्र पवार यांचा होय.

जेव्हा डॉ. विष्णूकुमार कर्डक लंडनला होते. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी (१९६२-१९६९ त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून २२ मे १९६८ ला सायकॉलॉजिकल टेस्ट्स अँड अ‍ॅसेसमेंट्स इन प्रेडीक्टिंग रीसल्ट्स यावर पीएच.डी.चा शोधनिबंध लिहिला, ज्याला पब्लिकेशनची मान्यता आहे). तेव्हासुद्धा सुमनताईंच्या खंबीर पाठिंब्यामुळे ते आपले वास्तव्य वाढवून शिक्षण पूर्ण करू शकले व परत आल्यावर समाजातील बर्‍याच मुला-मुलींना बँकेची नोकरी मिळवण्यात मदत करू शकले. त्यामुळेच आपली बरेच कुटूंब प्रगती करू शकले आणि त्यांच्या
पुढच्या पिढ्या चांगले शिक्षण घेऊन सामाजिक दर्जा वाढवू शकले.

१९७६ मध्ये डॉ. कर्डक यांनी जेव्हा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे काम सुरू केले तेव्हाही सुमनताईंची मोलाची साथ होती. त्यामुळेच रात्री उशिरापर्यंत ते केंद्राच्या जागेसाठी निधी संकलनाचे काम निर्धास्तपणे करू शकले. नंतर त्याच जागेवर केंद्राची आजची वास्तू उभी करण्यासाठी त्यांचा मुलगा संदीप कर्डक प्रयत्नशील होते. सुमनताईंच्या पाठपुराव्यामुळेच प्रयत्न फळास आले. त्यानंतर केंद्राच्या महिला विभाग स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा होता.

सुमनताईंनी समाजात आंतरजातीय विवाह केवळ प्रेमविवाह असतात हा पायंडा मोडून काढला. १९८९ साली त्यांचा मोठा मुलगा मिलिंद कर्डक याचा विवाह शीख समाजातील मुलीशी लावून दिला. विशेष म्हणजे त्या मुलीला धम्म दीक्षेची अटही घातली नाही. त्यामुळेच हा विवाह सोहळा नावाजला. त्यांच्या या सामाजिक जाणीवेमुळे अकाली (मिलिंदचे सासरकडचे) कुटुंबही त्यांच्या सामाजिक कार्यात सदैव मदत करत. मिलिंदची बायको डॉ. तरुणा कर्डकही वेळोवेळी सुमनताईंना बोर्डिंगच्या कामासाठी मदत मिळवून देत असे.

सुमनताई १९९५ पासून नाशिकच्या दलित शिक्षण संस्थेच्या सदस्य होत्या. पुढे २००० मध्ये त्या याच संस्थेच्या अध्यक्षा झाल्या. तेव्हा नाशिकमधील पेपरमध्ये संस्थेची विद्यार्थिनी संस्थेची अध्यक्षा झाली, अशी बातमी झळकली होती. याच संस्थेत मुलींच्या रमाबाई वसतिगृहाचे खराब झालेल्या खोल्यांची दुरुस्ती, मुलींसाठी शौचालय व स्नानगृहाची सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतः निधी संकलित केला. आपल्या मुलांकडूनही आर्थिक मदत घेतली. दुबईला जाऊन संदीप कर्डक यांच्या आंबेडकर मिशन संस्थेचीही मदत घेतली. आंबेडकर मिशनचे राजकुमार कांबळे स्वतः काम झाल्यानंतर ते काम पाहण्यासाठी आले होते. नंतरही वेळोवेळी आंबेडकर मिशनने संदीप कर्डक यांच्या प्रयत्नातून संस्थेला मदत केली. मनमाडची आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची मान्यता त्यांनी सचिवालयात पाठपुरावा करून चंद्रकांत हंडोरे यांच्या मदतीने परत मिळवली. या संस्थेची जबाबदारी पेलताना सुमनताईंना संस्थेचे सचिव पी. के. गायकवाड आणि पर्यवेक्षिका बेबी डेरले यांची मोलाची साथ लाभली. संस्थेचे सदस्य असलेले त्यांचे थोरले बंधू मनोहर रामचंद्र पवार व धाकटे बंधू डॉ. सुधाकर रामचंद्र पवार यांचा वैचारिक व आर्थिक पाठिंबा सदैव लाभला.

अशा कार्यामुळेच सुमनताई कर्डक समाजातील स्त्रियांच्या आदर्श होत्या. ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्या आपल्यातून अचानक निघून गेल्या. मात्र, जाताना समाजकार्याचा वसा देऊन गेल्या. हा वसा जपणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. सर्व कर्डक व पवार कुटूंबिय सदैव आर. आर. पवार, सुमनताई कर्डक आणि डॉ. विष्णूकुमार कर्डक यांची सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि त्यांचा वारसा पुढे चालवण्यास बांधील राहील!

First Published on: October 18, 2021 5:32 PM
Exit mobile version