जऊळके दिंडोरी शाळेत साकारतेय पहिली ‘लॅपटॉप लॅब’

जऊळके दिंडोरी शाळेत साकारतेय पहिली ‘लॅपटॉप लॅब’

 नाशिक: दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी जिल्हा परिषद शाळेत पहिलीच लॅपटॉप लॅब साकारली जात आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावीपणे होण्यासाठी लॅब मदतरूप ठरणार आहे. दिंडोरीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी शाळेला भेट देत प्रस्तावित लॅबच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

जऊळके दिंडोरी शाळेत १ ली ते ७ वी इयत्तेच्या २१० विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची गोडी निर्माण व्हावी व अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ मनोरंजक व्हावी, या हेतूने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व तुकाराम जोंधळे यांचे विशेष प्रयत्नातून शाळेत २५ लॅपटॉपची लॅब साकारली जात आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच लॅब असल्याने जऊळके शाळा आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येत आहे. याच वर्षी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्ताराधिकारी सुनीता आहिरे, केंद्रप्रमुख शरद कोठावदे यांचे मार्गदर्शनाखाली नालंदा प्रकल्प अंतर्गत इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना ४० टॅबच्या माध्यमातून शिकवले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आनंददायी पध्दतीने अध्ययन अध्यापनात रस घेऊ लागले आहे.

स्कॉलरशिप परीक्षेत ५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत प्रयोगशाळा उभारण्यात आली असून ५२० प्रकारचे प्रयोग साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रयोशाळेचा विद्यार्थी लाभ घेत आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शिक्षकांनी स्मशानभूमीत शाळा भरवली. त्यामुळे हा उपक्रम लक्षवेधी ठरला. शालेय आवारात वृक्षारोपण सौंदर्य वाढवत आहे. कोरोना कालावधीत ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी समाज सहभागातून मोबाईल, एफएम रेडिओ विद्यार्थ्यांना देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शाळेला महिंद्रा कंपनी व ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुसज्ज व आकर्षक इमारत निर्माण करण्यात आली आहे.

या सर्व उपक्रमामुळे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जोंधळे यांचे प्रयत्नातून शाळेला सुसज्ज अशी लॅपटॉप लॅब साकारली जात आहे. त्यासाठी आवश्यक फर्निचर दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून २५ लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहेत. लॅबच्या दर्शनी भागातील भिंतीवर संगणक किबोर्डची थ्री डी प्रतिमा साकारण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज ज्ञान मिळेल व विद्यार्थी संगणकीय कृतीकडे आकर्षित होतील हा हेतू असल्याचे शाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शाळेला भेट देत शालेय उपक्रमाचे कौतुक करत सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.

दिंडोरीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी नुकतीच भेट देऊन लॅबच्या कामाची पाहणी केली. यावेळी सरपंच भारतीताई जोंधळे, सदस्य तुकाराम जोंधळे मुख्याध्यापक शैलजा मोरे, कांतीलाल भरसट, संगीता जोपळे, कमल देवरे, कल्याणी वासेकर, उत्तम भोये, हरिभाऊ बच्छाव, सुप्रिया धोंडगे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन होऊन विद्यार्थी स्पर्धेच्या युगात अधिक प्रगत व्हावे हा हेतू असून यासाठी सरपंच भारतीताई जोंधळे, ग्रामपंचायत सदस्य,सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे तुकाराम जोंधळे यांनी नमूद केले.
– तुकाराम जोंधळे, ग्रामपंचायत सदस्य

First Published on: November 19, 2021 4:29 PM
Exit mobile version