संदर्भ रुग्णालय की ‘सुसाईड पॉइंट’

संदर्भ रुग्णालय की ‘सुसाईड पॉइंट’

संदर्भ सेवा रुग्णालय (फाइल फोटो)

शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचार घेणार्‍या जवाहरलाल रामकिसन गुप्ता (४०, श्रमिकनगर, घोटी, इगतपुरी) या रुग्णाने शनिवारी (९ फेब्रुवारी) सकाळी १०.१५ वाजता तिसर्‍या मजल्यावरील जनरल वॉर्डच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. या रुग्णालयात आत्महत्येची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. तर मागील दोन वर्षातील ही चौथी घटना आहे. रूग्णालय प्रशासनाने खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा लेखी प्रस्तावही दिला आहे. मात्र, बांधकाम विभागा त्याकडे दुर्लक्ष करत असून या विभागाच्या आडमुठेपणामुळे चौथ्या रूग्णाचा बळी गेला आहे.

१२ जानेवारी २०१९ रोजी सुध्दा डायलिसीसची प्रक्रिया सुरू होऊन एक तास उलटल्यानंतर अचानक रहीमखान पठाण यांनी संतापून डायलिसीसमध्ये बाधा आणली. तसेच, जवळील रुग्णाच्या खाटेवर पाय ठेवून खिडकीवर चढत डोक्याने जोराची धडक मारून खिडकीची काच फोडली. यावेळी वार्डमध्ये उपस्थित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व टेक्निशियन त्यांना रोखण्यासाठी धावेपर्यंत पठाण यांनी खिडकीतून खाली उडी मारली. यानंतर लगेचच रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचारी व परिसरातील सुरक्षारक्षकांनी खाली धाव घेत रहीमखान यांना जखमी अवस्थेत उचलून तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरुवात झाली. मात्र, तिसर्‍या मजल्यावरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. गतवर्षी रुग्णालयातील याच मजल्यावरून किशन पाटोळे रुग्णाने उडी मारून आत्महत्या केली होती. हे तीनही रूग्ण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. गंभीर रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात बांधकाम विभाग दिरंगाई करत असल्याने चार रुग्णांचे प्राण गेल्याची संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.

संदर्भ रुग्णालयात रुग्णांकडून होणार्‍या आत्महत्यांच्या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील धोकेदायक क्षेत्रात व खिडक्या असलेल्या ठिकाणी जाळ्या लावण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत असल्याने जाळ्यांचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे. तो लवकर मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

रूग्णांमध्ये भिती

जवाहरलाल गुप्ता हे जनरल वॉर्डमध्ये दाखल झाल्याने त्यांना खाट क्रमांक २ देण्यात आला. त्यामुळे खाट क्रमांक १ व ३ वरील रूग्णांशी त्यांची ओळख झाली. त्यामुळे दिवसभर रूग्ण आणि नातेवाईकांशी गुप्ता यांचा अनौपचारिक संवादही होत होता. गुप्तांनी अचानकपण खाटेशेजारी खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याने आजूबाजूचे रूग्ण धास्तावले आहेत. खाट क्रमांक एक आणि तीनच्या रूग्णांनी डिस्चार्ज घेतला आहे. गुप्तांच्या आत्महत्येमुळे जनरल वॉर्डमधील इतर रूग्णही धास्तावले आहेत.

नायलॉनच्या दोर्‍या लावणार

रुग्णालयातील खिडक्यांसह बाल्कनीच्या दरवाज्यांवर लोखंडी जाळ्या लावण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाला दिलेला आहे. या प्रस्तावाकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रूग्णालयाच्या निधीतून खिडक्यांना नायलॉन दोर्‍या बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी संयुक्त संचालकांकडे प्रस्ताव पाठविला असून त्यास त्यांनी मान्यताही दिली आहे. रूग्णाने जीव धोक्यात घालू नये, यासाठी रूग्णासोबत एक नातेवाईकास जनरल वॉर्डमध्ये सोबत राहण्यास परवानगी दिली जाणार आहे.
– डॉ. वशिष्ठ बालाजी नामपल्ली, विशेष कार्य अधिकारी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय

First Published on: February 10, 2019 8:24 PM
Exit mobile version