मोदींच्या हस्ते गोदा-आरतीचा मुहूर्त टळला

मोदींच्या हस्ते गोदा-आरतीचा मुहूर्त टळला

काश्मिरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. परिणामी १९ सप्टेंबर रोजी होणार्‍या नाशिकच्या दौर्‍यातील गोदावरी आरतीचा प्रस्तावही सुरक्षिततेचे कारण देऊन पंतप्रधान कार्यालयाने अमान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मोदींची सभा तपोवन येथे होत असून सभास्थळी मांडव उभारणीच्या कार्याचा शुभारंभ मंगळवारी (दि.११) करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाने राज्यात सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये येत्या १९ सप्टेंबरला होत आहे. या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अमीत शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या दौर्‍याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी प्रस्तावित नियोजन मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयास पाठवले होते. त्यात मोदींच्या हस्ते गोदावरी नदीची आरती करण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसा प्रस्तावही स्थानिक पदाधिकार्‍यांनी पंतप्रधान कार्यालयास पाठवला होता. मात्र, सुरक्षिततेचे कारण देत हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. तपोवनात दुपारी ३ वाजता होणार्‍या सभेशिवाय अन्य कोणताही कार्यक्रम मोदी यांच्या उपस्थित होणार नाही, हे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केल्याचे समजते.


हे देखील वाचा – एकीकडे युतीसाठी आणाभाका; स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांना लाथा


१८ सप्टेंबरला महाजनादेश यात्रा

नाशिकमध्ये येत्या १८ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाजनादेश यात्रेचे आगमन होणार आहे. पाथर्डी फाटा ते तपोवन असा यात्रेचा मार्ग राहील. नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व या तीन्ही मतदार संघातून यात्रा जाणार आहे. यावेळी शहरात बाईक रॅलीही काढण्यात येईल.

First Published on: September 10, 2019 11:55 PM
Exit mobile version