दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या हटके वाटा

दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या हटके वाटा

रेवती वालझाडे । नाशिक
दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसोबतच पालकांनादेखील करिअरच्यादृष्टीने चिंता सतावते आहे. बारावी कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. १० वर्षापूर्वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा बी.टेक, एमबीबीएसबी, फार्मसी या क्षेत्रांकडे कल असायचा. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी सीए, बी.कॉम या शाखांमध्ये आपलं करिअर घडवत होते, तर कला क्षेत्रातील विद्यार्थी एलएलबी, बीबीए या शाखांची अधिक प्रमाणात निवड करायचे. मात्र, आज आधुनिक तंत्रज्ञान आणि बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा कलदेखील बदलला आहे.

दुसरीकडे या शिक्षणाच्या या पारंपरिक वाटा सोडून पालक आपल्या मुलांमध्ये कोणते गुण आहेत, त्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे जाणून घेण्यात व त्याच दिशेने आपल्या पाल्याचे भविष्य घडविण्यात अधिक रस दाखवताना दिसतात. मुलींमध्ये उपजतच घर सजवण्याची किंवा काही छंद जोपासण्याची आवड असते, त्याचप्रकारे मुलांमध्ये फोटो काढणे, एखादा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणे किंवा चित्रकला यांसारखी कला असते. त्यातच ते भविष्य घडवताना दिसतात. कधीकाळी केवळ छंद म्हणून पाहिल्या जाणार्‍या या क्षेत्रांमध्ये शास्त्रशुद्ध शिक्षणही आता उपलब्ध झाल्याने, त्याकडे करिअर म्हणून पाहिले जाते आहे. दहावी-बारावीचा निकाल लागल्याने, अशाच काही क्षेत्रांबद्दल घेतलेली ही माहिती.

 प्रत्येक व्यक्तीला आपले घर, ऑफिस छान दिसावे, प्रत्येक जागेचा अधिकाधिक उपयोग व्हावा, असे वाटत असते. त्यामुळेच इंटेरिअर डिझायनरची मागणी वाढलेली दिसते. कधीकाळी केवळ छंद असलेले हे क्षेत्र शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षणामुळे करिअरचा प्रभावी पर्याय बनले आहे. इंटिरियर डिझायनरचे प्रमुख काम म्हणजे उपलब्ध जागेचे योग्य नियोजन करून ती जागा सुशोभित करणे. त्यासाठी वेगवेगळ्या वस्तुंचा वापर, रंगसंगती, घरातील व्यक्ती व वस्तूंचा विचार केला जातो.

शैक्षणिक संधी : बारावी किंवा कोणत्याही शाखेतून पदवी घेतल्यानंतर तुम्ही या कोर्सला अ‍ॅडमिशन घेऊ शकता.

नोकरीच्या संधी : इंटेरिअर डिझायनर केवळ घर सजवण्याचे काम करतात असे नाही. विविध क्षेत्रांमधील ऑफिस, घर किंवा एखादे फार्म हाऊस अशा सर्व ठिकाणी इंटेरिअर डिझायनर्सला नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

ग्राफिक डिझायनिंग ही एक कला आहेच, पण आज या विषयात शिक्षण घेऊन रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. ग्राफिक डिझायनिंग ही तुमच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरते. शिवाय ग्राफिक डिझायनिंग हे कलेला वाव देणारे उत्तम क्षेत्र आहे. या विषयातील शास्त्रशुद्ध पद्धतीचे शिक्षणदेखील उपलब्ध आहे.

शैक्षणिक संधी : प्रिन्सिपल ऑफ प्रेफिक्स, डिझाईन, कलर थिअरी, टायपोग्राफी कंपोझिशन, कोरल ड्रॉ, फोटोशॉप व इन डिझाईन इ. शिक्षण यात दिले जाते. बारावी किंवा ग्रॅज्युएशननंतर हा कोर्स करता येतो.

करिअरच्या संधी : ग्राफिक डिझायनिंगमध्ये शिक्षण घेतल्यानंतर प्रामुख्याने जाहिरात, मार्केटिंग आणि प्रकाशन या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्स केल्यानंतर मोठ्या कंपन्यांमध्येसुद्धा नोकर्‍यांच्या संधी आहेत.

आजचे युग हे धावपळीचे आणि इव्हेंट्सचे आहे. लग्न असो किंवा बारसे, घराचे उद्घाटन असो किंवा दुकानाचे ओपनिंग; या कार्यक्रमांचे उत्तम नियोजन फार महत्त्वाचे असते. म्हणून या क्षेत्राला अलिकडे सुगीचे दिवस आले आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करताना चोवीस तासात केव्हाही काम करण्याची तयारी असावी लागते.

शैक्षणिक संधी : डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स उपलब्ध असणार्‍या अनेक संस्था आहे. डिप्लोमा कोर्ससाठी बारावी पास तर, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करण्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे.

करिअरच्या संधी : लग्न, रिसेप्शन, ट्रेड शो, विविध प्रदर्शने, प्रचार सभा, रोड शो, प्रॉडक्ट लाँच अशा वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट मॅनेजमेण्ट करण्याच्या भरपूर संधी आहेत.

फॅशन डिझाइनिंग म्हटल्यानंतर रंगबिरंगी कपडे डोळ्यांसमोर येतात. पण फॅशन डिझायनिंग हे एक उत्तम करिअरचे क्षेत्रदेखील आहे. या क्षेत्रातही शास्त्रशुद्ध शिक्षण उपलब्ध आहे. फॅशन डिझायनिंग केवळ शिक्षण नाही जगण्याची कला आहे. त्यात दैनंदिन वापराच्या उत्पादनांच्या डिझायनिंग व निर्मितीचाही समावेश असतो.

शैक्षणिक संधी : बारावी कोणत्याही शाखेतून पास झाल्यानंतर किंवा दहावीनंतरसुद्धा आपण या कोर्सला अ‍ॅडमिशन घेऊ शकतो.

नोकरीच्या संधी : फॅशन डिझायनर हे कंपनीत काम करू शकतात. त्याचबरोबर स्वतःच बुटीकदेखील सुरू करू शकता. मोठा व्यवसायही करू शकतात. आज फॅशन गरज बनल्याने यात अनेक संधी आहेत.

मास मीडिया केवळ जनसंपर्क, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, रेडिओ, मासिक, इंटरनेट एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर, बातम्या संकलन, चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात, कम्युनिकेशन, व्यवस्थापन यांसारख्या अनेक क्षेत्रात मास मीडिया प्रभावी ठरतो. यापैकी कोणत्याही क्षेत्रात आवड असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय उत्तम आहे.

शैक्षणिक संधी : बारावी झाल्यानंतर बीएमएम अर्थात बॅचलर ऑफ मास मीडिया कोर्सला अ‍ॅडमिशन घेता येते.

करिअरच्या संधी : बीएमएम कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही समाजमाध्यमांमध्ये काम करता येते. त्याचप्रकारे आपण स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करू शकतो. अशा अनेक रोजगाराच्या संधी या कोर्समध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतात.

First Published on: June 20, 2022 1:52 PM
Exit mobile version