“त्या” महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले !

“त्या” महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले !

नाशिकरोड : येथील गोरेवाडी परिसरातील चिडे मळ्यात दोन दिवसांपूर्वी ऊसाच्या शेतात मिळून आलेल्या मृत महिलेच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने तपासाचा गुंता वाढला आहे. परिणामी, आता नाशिकरोड पोलिसांनी तपासाची दिशा बदलली असल्याचे सांगण्यात आले.

गोरेवाडी परिसरातील उसाच्या शेतात मंगळवारी (दि.५) सकाळी उसतोडणी कामगारांना एका वीस ते पंचवीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. महिलेच्या अंगावर लाल व निळ्या रंगाचा चौकटी कुर्ता व पिवळ्या रंगाचा सलवार आढळून आला आहे. बुधवारी (दि.६) मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून यात मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्याहदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण गोसावी तपास करत आहेत.

अहवालात कारण स्पष्ट न झाल्याने इतर गोष्टींच्या आधारे तपास सुरु करण्यात आला आहे. मृतदेहाचे पाय पोटाच्या दिशेने मुडपलेल्या अवस्थेत व गळ्याभोवती ओढणी गुंडाळलेल्या अवस्थेत मिळून आला होता. ही महिला शहराबाहेरील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. व्यक्तीचे मृतशरीर तीन ते चार तास ज्या अवस्थेत असते, तिच अवस्था पाहायला मिळते. त्यामुळे पाय मुडपलेले असल्याने अगोदरच मृत महिलेला गोणीत भरून येथे आणून टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे चार-पाच तासांच्या प्रवासातील नाशिक व शेजारील जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत महिला हरविल्याच्या नोंदींची माहिती घेतली जात आहे. महिलेचा पत्ता शोधल्यानंतर पुढील तपासाला वेग येऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, या निर्मनुष्य भागात तपासात अडथळे येत असल्याने पाच किलोमीटरच्या परिघातील सीसीटीव्हींचीही तपासणी केली जात आहे.

First Published on: July 7, 2022 2:27 PM
Exit mobile version