मंदीने मारले अन् दुष्काळाने झोडपले तरी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांची ओढ सुटेना!

मंदीने मारले अन् दुष्काळाने झोडपले तरी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांची ओढ सुटेना!

कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले

ज्ञानेश उगले

कांदा शेतीने मारले अन दुष्काळाने झोडपले तर जायचे कुठे? असाच प्रश्न कांदा उत्पादकांना पडला आहे. गेले वर्षभर तोटा सोसूनही शेतकर्‍यांनी दुसरा पर्याय नसल्याने पुन्हा उन्हाळ कांद्याचाच पर्याय स्विकारला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत नाशिक विभागात १ लाख २६ हजार ८१६ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. येत्या महिन्यात ही लागवड दीड लाखाचा टप्पाही ओलांडेल असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील चार वर्षातील सरासरी प्रमाणेच यंदाही उन्हाळ कांद्याचे क्षेत्र वाढीव असल्याने उत्पादनही वाढणार आहे. या स्थितीत कांद्याचे दर वाढतील का? याबाबत साशंकताच राहणार आहे.

कृषि विभागाच्या माहितीनुसार नाशिक विभागात जवळपास दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. यात अर्थातच नाशिक व नगर जिल्हा आघाडीवर आहे. नाशिक जिल्ह्यात ७८ हजार २६२ हेक्टर तर, नगर जिल्ह्यात ३८ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. त्या खालोखाल धुळे जिल्ह्यात ५४०४, जळगाव जिल्ह्यात ४२५० आणि नंदुरबार जिल्ह्यात ३०४ हेक्टर कांदा लागवड आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यातच उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र मागील पाच सहा वर्षात देशभर कांदा लागवडीचा कल वाढला आहे. आंध्रप्रदेश, बिहार, तामिळनाडू, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब या उत्तरेतील राज्यातही उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. या शिवाय छत्तीसगड, तेलंगाणा, ओडिशा, झारखंड, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम या राज्यात म्हणजे देशभरच वेगवेगळ्या हंगामात कांद्याची लागवड वाढली असल्याने देशात वर्षभर कांद्याची उपलब्धता वाढली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत आवक जास्त ही स्थिती बाजारात निर्माण होत असल्याने कांद्याचे स्थिर दर मिळणे अवघड झाले आहे.

कांद्याला पर्याय नाही
राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यात नाशिक कांदा उत्पादनात सर्वात पुढे आहे. जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, चांदवड, सटाणा, मालेगाव, देवळा, कळवण, नांदगाव, येवला, मालेगाव या दुष्काळी तालुक्यातील कांदा हे प्रमुख पिक आहे. दुष्काळी भागात, तुलनेने कमी पाण्यात, कमी कालावधीत येणारे दुसरे पर्यायी पिक नसल्याने कांदा लागवड केली जात असल्याने निमोण येथील कांदा उत्पादक भाऊसाहेब गोसावी यांनी सांगितले.

कांदा चाळ योजनेमुळे कांदा साठवणुकीची संधी

गेल्या काही वर्षात राज्यातील जवळपास १३८ साखर कारखाने बंद पडले आहेत. या स्थितीत ऊस या नगदी पिकाची जागा कांद्याने घेतली आहे. त्यामुळे कांदा उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. कांदा चाळ योजनेमुळे कांदा साठवणुकीची संधी प्राप्त झाली. मात्र आता या साठवणुकीचाच फटका कांदा शेतीला बसला आहे. उन्हाळ कांदा हा दीर्घकाळ साठवता येत असल्याने ही लागवड जास्त प्रमाणात होते. या समस्येवर सध्यातरी अल्पकालीन उपाय दिसत नाही.
– मोहन वाघ, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी, नाशिक.

First Published on: January 30, 2019 11:49 PM
Exit mobile version