निनावी पत्राव्दारे पोलिसांनी घेतला शोध अन् उघडकीस आले भलतेच

निनावी पत्राव्दारे पोलिसांनी घेतला शोध अन् उघडकीस आले भलतेच

मृत अमोल वर्हे

गावातील एका तरुणाचा खून वडील, भाऊ आणि नातेवाईकांनी केल्याचे निनावी पत्र नाशिक ग्रामीण पोलिसांना आले. त्याआधारे पोलिसांनी शहनिशा करत तपास सुरु केला. पोलीस तपासात धक्कादायक घटना उघडकीस आली. मद्यधुंद अवस्थेत आई व वडिलांना मारहाण करणार्‍या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाच्या मृतदेहास दगड बाधून गोदावरी नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे तपास समोर आले आहे. विशेष म्हनजे, मुलगा गायब किंवा मयत झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दिली नसल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी निनावी पत्राच्या आधारे कसोसीने शोध घेत खूनाचा छडा लावला.

नगरसूल (ता.येवला) येथील अमोल सोमनाथ वर्हे (वय १९) असे खून झालेल्याचे नाव आहे. वडील सोमनाथ आसाराम वर्हे (वय ५०), भाऊ भीमराज सोमनाथ वर्हे (वय २४), किरण सोमनाथ वर्हे (वय २०) अशी खून करणार्‍यांची नावे आहेत.

अमोल वर्हे चार महिन्यांपासून गायब झाला होता. त्याचा खून वडील, भाऊ आणि नातेवाईक यांनी करुन त्याचे प्रेत लोहशिंगवे येथील जंगलात पुरुन टाकलेले आहे, अशा आशयाचे पत्र नाशिक ग्रामीण पोलिसांना डिसेंबर महिन्याच्या तिसर्‍या प्राप्त झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शहानिशा करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. पोलिसांनी अमोलच्या मित्रांकडे चौकशी केली. ३० ऑगस्ट २०२० रोजी त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले. तेंव्हापासून त्याचा मोबाईल बंद येत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. अमोलचा घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याच्या दोन भावांसह वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी खूनाची कबुली दिली. खूनाचे कारण विचारले असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. अमोलला दारु पिण्याचे व्यसन होते. तो नशेमध्ये आई-वडिलांना मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीसुद्धा त्याने आईवडिलांना मारहाण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा केला खून

पोलिसांनी अमोलच्या वडिलांसह दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली. तिघेही लपवालपवी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता पित्राच्या महिन्यातील रविवारी ९.३० वाजता अमोलचा राहत्या घरात दोरीने गळफास देवून केला. त्याच्या मृतदेहास दगड बांधून गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात मळेगाव (ता. कोपरगाव) येथे फेकल्याची कबुली तिघांनी दिली.

First Published on: December 21, 2020 3:37 PM
Exit mobile version