ओझर नगरपरिषद सफाई कर्मचार्‍यांचा संप मिटला

ओझर नगरपरिषद सफाई कर्मचार्‍यांचा संप मिटला

ओझर : येथील बहुचर्चित विषय ठरलेल्या नगरपरिषदेच्या सफाई कर्मचार्‍यांचा सहा दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत उपोषण संप माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदमांच्या मध्यस्तीने मिटला असून सफाई कर्मचारी बुधवारी सकाळपासूनच आपआपल्या कामावर हजर झाल्याने गावात सहा दिवसांपासून ठिकठिकाणी साचलेल्या कचर्‍याचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्यास आळा बसणार आहे.

येथील नगरपरिषदेच्या सफाई कर्मचार्‍यांचे विविध आठ मागण्यांसाठी नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू होते व त्यास नगरपरिषदेच्या सर्व विभागाच्या कर्मचार्‍यांनी व ओझर गावातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. ३० सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत संपाचा ५ ऑक्टोबर रोजी रात्री शेवट झाला. ओझर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी सफाई कर्मचार्‍यांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली. या चर्चेदरम्यान कर्मचार्‍यांच्या असलेल्या मागण्यांपैकी थकीत पगार, ग्रॅज्युएटी रक्कम व भविष्यनिर्वाह निधी यासाठी लागणार्‍या खर्चाची रक्कमेची पूर्तता करून त्यांनी स्वतः कडून सहा लक्ष रुपये किंमतीचे पाच धनादेश व पाच लाख रुपयांचे दोन धनादेश असे एकूण ४० लाख रुपये किंमतीचे धनादेश शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या ओझरच्या अध्यक्षा आशा दिवे यांच्याकडे सुपूर्द केले.हा धनादेश मिळाल्यानंतर सफाई कर्मचार्‍यांनी पाणी पिऊन संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

आमचे थकीत पगार, ग्रॅज्युएटी रक्कम व भविष्यनिर्वाह निधी यासाठी यतीन कदम यांनी जबाबदारी घेतली असून सहा लाख रुपये किंमतीचे पाच धनादेश व पाच लाख रुपयांचे दोन धनादेश असे एकूण ४० लाख रुपये किंमतीचे धनादेश आमच्याकडे दिले असून शासनाने पैसे न दिल्यास यतीन कदम आमच्या मागण्यांसाठी बांधील असल्याचे त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे. आम्ही संप मागे घेत आहोत.
                – आशाबाई दिवे, शिवराज्य सफाई कर्मचारी सेना अध्यक्ष, ओझर नगरपरिषद

गावचा विचार करून सफाई कामगारांची थकीत रक्कम प्रशासनाकडून काढून देण्याची हमी व जबाबदारी कामगारांना दिली. त्यामुळे कामगारांनी संप मागे घेतला आहे.
                   – यतीन कदम, माजी जि. प. सदस्य

First Published on: October 7, 2021 7:48 AM
Exit mobile version