सोशल मीडियावर आले एकत्र अन् उभी केली शाळा

सोशल मीडियावर आले एकत्र अन् उभी केली शाळा

सोशल मीडियावर आले एकत्र अन् उभी केली शाळा

पीव्हीजी महाविद्यालयातील काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप सुरू केला. या ग्रुपवर चर्चा करत असताना आपण समाजाचे देणे लागतो, त्यामुळे समाजासाठी काही करणे आपले कर्तव्य आहे, यावर एकवाक्यता झाली. त्यानुसार प्रत्येकाने आपापल्यापरीने निधी जमा करत एज्युक्वॉईन फाऊंडेशनची स्थापना केली. दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे येथील शाळेत बेंचेस, पाण्याची टाकी आणि वॉटर प्युरिफायर देण्याचे महतकार्य एज्युक्वॉईनने काही दिवसांपूर्वीच केले.

कोशिंबे येथील विरभद्र माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी मोठे चुणचुणीत. पण शाळेची आर्थिक परिस्थिती काहीशी बिकट आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात त्यामुळे उंची शुल्क आकारले जात नाही. शाळेतील बेंचेसने गेल्या वर्षांपासून मान टाकली होती. त्यावर बसणेदेखील मोठे दिव्य होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळणेही दुरापास्त होते. ही बाब जेव्हा पीव्हीजीच्या या माजी विद्यार्थ्यांना समजली, तेव्हा त्यांनी तातडीने शाळेची भेट घेत तेथील परिस्थिती समजून घेतली. त्यानुसार प्रत्येकाने आपापल्या परिने निधी जमा केला. यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यात जमा झालेल्या निधीतून शाळेसाठी नवेकोरे बेंचेस खरेदी करण्यात आले. त्याचप्रमाणे पाण्याच्या टाकीची व्यवस्था करून वॉटर प्युरिफायर बसवण्यात आलेत. शाळेच्या बदललेल्या या रुपड्याने विद्यार्थ्यांमध्येही आता उत्साह संचारला आहे.

काय आहे एज्युक्वॉईन?

सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठीही होऊ शकतो हे एज्युक्वॉईनने दाखवून दिले आहे. या संस्थेने आजवर जिल्ह्यातील १३ शाळांना ‘विद्याधन’ या उपक्रमांतर्गत ग्रंथालय सरू करून दिले आहे. याशिवाय शिक्षण अडकलेल्यांना आर्थिक मदत करणे, मानसिक अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प वॉक, अनाथ आश्रमातील गरजूंना वस्तूंचे तसेच कपड्यांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, जागरूकता व करिअर मार्गदर्शन अभियान, पर्यावरणाच्या जाणिवेतून वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, अंध व अपंगांना मदत, अनाथ आश्रमात जाऊन वाढदिवस साजरे करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यानंतर शाळेला मदत करण्याचा संकल्प या तरुणांनी सोडला.

गुणवत्तेला वाव देण्यासाठी पुढाकार

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता प्रचंड असते. या गुणवत्तेला वाव देण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटले. त्यातून बेंचेस देण्याची संकल्पना पुढे आली. – निखिल ढगे, सदस्य, एज्युक्वॉईन

गुणवत्तेत सुधारणा होईल

कोशिंबे येथील शाळेला बेंचेस भेट दिल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. शिक्षणायोग्य पोषक वातावरण येथे निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच सुधारणा होईल असा आमचा विश्वास आहे. – कल्पेश बारी, सदस्य, एज्युक्वॉईन

First Published on: July 15, 2019 11:59 PM
Exit mobile version