कचराकुंडी नव्हे हे तर हे तर महापालिकेचे उद्यान

कचराकुंडी नव्हे हे तर हे तर महापालिकेचे उद्यान

नाशिक : कचर्‍याचे ढिग, गंजलेले गेट, तुटलेल्या खेळण्या, दुर्गंधी, ढासळलेले वॉल कम्पाऊंड अशा परिस्थितीमुळे म्हसरुळच्या गुलमोहर नगरातील उद्यानाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. महापालिकेने तातडीने या समस्यांकडे लक्ष देऊन उद्यानाची दूरवस्था थांबवावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

अभिषेक विहारमागील गणपती मंदिराजवळ असलेल्या या उद्यानाची नियमित देखभाल व स्वच्छता होत नसल्याने उद्यानाला कचराकुंडीची अवस्था प्राप्त झाली आहे. खेळणीच्या जागेत झाडाझुडपांच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्याने खेळण्यांपर्यंत पोहचण्यासाठी मुलांना कचर्‍यातून मार्ग काढावा लागतो. काही खेळण्या गंजल्याने त्यांच्यापासून मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उद्यानात पडलेल्या कचर्‍याची स्वच्छता केली जात नसल्याने त्याचे ढिग जमा झाले आहेत. उद्यानात छोट्या वनस्पती, वृक्षांची रोपे आहेत, मात्र, सुरवातीच्या काळात लावलेली रोपेच दुर्लक्षित झाल्यामुळे ती जळून गेली. कचर्‍यामुळे उद्यानातील हिरवळ देखील गायब झाली आहे. याकडे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून लक्षच दिले जात नसल्याने उद्यान ओसाड पडले आहे. वाढत्या लोकवस्तीच्या भागात उद्यानांची गरजही आहे. परिसरात उद्यानाचा विकास करण्याचे काम महापालिकेकडून केले जात असले तरी नव्याचे नऊ दिवस संपले की पालिकेचे उद्यानाकडे दुर्लक्ष होते. दरम्यान, उद्यानात पाण्याची व्यवस्था करून येथे नव्याने रोपांची लागवड करावी, त्यांची नियमित निगा राखावी, खेळण्यांची दुरुस्ती व्हावी, कचरा टाकणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ई-कनेक्ट अ‍ॅपचा देखावा

नागरी तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेने NMC-E-Connect मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन दिलेले आहे. मात्र, यावर तक्रारी करुनदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तक्रार केल्यानंतर ती परस्पर बंद केली जाते. फसवी आश्वासने दिली जातात. विशेषतः अतिक्रमणाबाबत केलेल्या तक्रारी चार-चार महिने प्रलंबित ठेवल्या जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

First Published on: May 5, 2023 2:19 PM
Exit mobile version