बाजार समित्यांमध्ये दररोज 300 कांदा ट्रॅक्टरचा लिलाव

बाजार समित्यांमध्ये दररोज 300 कांदा ट्रॅक्टरचा लिलाव

नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु झाले आहेत. बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांची गर्दी होऊ नये म्हणून दररोज फक्त तीनशे ट्रॅक्टरचा लिलाव केला जातो. त्यासाठी बाजार समितीच्या फोनवर नोंदणी करुन शेतकर्‍यांना टोकन क्रमांक दिला जातो. एका ट्रॅक्टरवर एकाच शेतकर्‍याला प्रवेश दिला जात आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरु असल्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव करण्याचा निर्णय बाजार समिती सभापतींनी घेतले. प्रत्येक दिवशी तीनशे ट्रॅक्टर, वाहनांना टोकन क्रमांक दिला जातो. त्यांना कोणत्या दिवशी किती वाजेला यायचे याविषयी कळवले जाते. चांदवड येथील शेतकर्‍यांना मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे माहिती दिली जात आहे. विशेष म्हणजे या बाजार समितीने शेतकर्‍यांचे 45 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवर दैनंदिन सूचना त्यांना देण्यात येत आहेत.
&
व्हॉट्सअपवर दैनंदिन माहिती
चांदवड बाजार समितीने पाच वर्षात तालुक्यातील 30 ते 40 हजार शेतकर्‍यांचे मोबाईल क्रमांक जमविले आहेत. त्यावर बाजार समितीचे निर्णय, सूचना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवली जाते. अधिकृत शेतकर्‍यांची 45 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. तसेच इतर 80 ग्रुपमध्ये बाजार समितीचा व्हॉट्सअप क्रमांक अ‍ॅड करुन एकूण 125 ग्रुप व प्रत्येक ग्रुपमधील 256 सभासदांप्रमाणे एकूण 30 हजार शेतकर्‍यांपर्यंत माहिती तत्काळ पोहोचवली जाते. तसेच सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी व मापारी याचाही स्वतंत्र ग्रुप सुरु करण्यात आला आहे.
&
कांदा लिलावाचे नियोजन
-बाजार समितीने दिलेल्या फोन क्रमांकावर नाव, गाव, वाहन क्रमांक व मोबाईल नंबरची नोंदणी करावी
-नोंदणी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहिल
-कांदा मोकळ्या स्वरुपात किंवा बारदान गोणीत भरुन आणावा
-फोनवर एसएमएसव्दारे 20 ते 24 तास अगोदर तारीख कळवण्यात येईल
-हा एसएमएस प्रवेश गेटवर दाखवणे बंधनकारक
-शेतकर्‍यांनी बाजार समितीत मुक्कामी येवू नये
-नोंदणी केलेल्या दिवशी कांदा विक्रीस न आणल्यास पुन्हा नोंदणी करावी लागेल
-पिकअपमध्ये कांदे आणू नये
-प्रत्येक शेतकर्‍याने किमान 5 ते 10 फूट अंतर ठेवून ट्रॅक्टर लावावे

First Published on: April 8, 2020 6:23 PM
Exit mobile version