बांधकामाचे पाच टन स्टील चोरणारे तिघे गजाआड

बांधकामाचे पाच टन स्टील चोरणारे तिघे गजाआड

नाशिक : इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाच टन स्टील चोरणार्‍या तिघांना नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने चेहेडी शिवार, नाशिक-पुणे महामार्ग, सीएनजी पेट्रोलपंपाशेजारी, नाशिक येथे अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ट्रक, स्टील व इतर साहित्य जप्त केले आहे. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार देवकिसन रुजाजी गायकर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नितीन रमेश ढेरिंगे (वय ३७, रा. पळसे, ता.जि.नाशिक), विनोद बळीराम मोरे (वय २९, रा. देवळालीगाव), सुनील दामू ताजनपुरे (वय ३७, रा.चेहडीगाव, ता.जि.नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, चेहेडी येथील पत्र्याच्या दुकानाच्या गाळ्यासमोर संशयित तिघे ट्रकमध्ये बांधकामासाठी वापरण्यात येणारे स्टील चोरत होते. ते स्टील तिघेजण ट्रकमध्ये ठेवत असताना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २० लाखांचा ट्रक (एमएच १५-एफयू ३०३०), इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारेसाडेतीन लाखांचे पाच टन वजनाचे स्टील, तीन हजारांचे दोन लोखंडी बार कट करण्याची कटर मशीन, ५० हजारांची लोखंडी शिडी असा एकूण २४ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने करत आहेत.

First Published on: May 13, 2022 11:10 PM
Exit mobile version