कारवर कोसळले झाड, तीन शिक्षक जागीच ठार

कारवर कोसळले झाड, तीन शिक्षक जागीच ठार

नाशिकहून कळवणपर्यंत नियमित अप-डाऊन करणार्‍या शिक्षकांच्या गाडीवर अचानकपणे झाड कोसळल्याने तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील वरखेड फाट्याजवळ बुधवारी (दि.२१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली. यात दत्तात्रय गोकुळ बच्छाव (५१, रा. किशोर सूर्यवंशी मार्ग, नाशिक), रामजी देवराम भोये (४९) व नितीन सोमा तायडे (३२, दोघेही राहणार रासबिहारी लिंकरोड) यांच्यावर काळाने घाला घातला. हे तिघेही शिक्षक कळवण तालुक्यातील अलंगुन येथील शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलचे शिक्षक होते. माजी आमदर जे. पी. गावित यांची ही शिक्षण संस्था आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये राहत असलेले हे शिक्षक नियमितपणे अलंगुन येथे अपडाऊन करत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे नाशिक-कळवण रस्त्यावरुन कारने (एमएच १५-एफएन ०९९७) नाशिककडे येत होते. वरखेड फाट्याजवळील फॉर्ज्युन कंपनीच्या गेटसमोरील एक वाळलेले लिंबाचे झाड गाडीवर कोसळले. त्यामुळे कार चालकास काही कळण्याच्या आताच गाडीमधील तिघांचाही बसल्या जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांना धाव घेत बचाव कार्य सुरु केले. परंतु, तोपर्यंत काळाने त्यांच्यावर घाला घातलेला होता. त्यांना पोलिसांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण अधिक तपास करत आहेत.

First Published on: July 21, 2021 8:10 PM
Exit mobile version