पुत्रलाडात पवारांची हयात गेली

पुत्रलाडात पवारांची हयात गेली

नाशिक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरू झालेले राजकारण थांबण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.१७) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा टोला लगावला आहे. पुत्राचे लाड पुरवण्यात तुमची हयात गेली. त्यामुळे दुसर्‍यांच्या घरात चांगली मुले असतात हे कधी तुम्हाला दिसलेच नाही. यामुळेच सुजयला भाजपमध्ये यावे लागल्याचे सांगत ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत काँग्रेस आघाडीचा समाचार घेतला. येथे शिवसेना व भाजपच्या महामेळाव्यात ते बोलत होते.

महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांसाठी युतीच्या पदाधिकार्‍यांचा पहिलाच संयुक्त मेळावा नाशिकमध्ये चोपडा लॉन्स येथे पार पडला. यावेळी ठाकरे म्हणाले, गेली चार वर्ष शिवसेना व भाजपमध्ये सुरू असलेले भांडण म्हणजे ‘हम आपके है कोन’ हे युती झाल्यानंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये सुरू झाले आहे. काही मुद्यांसाठी आम्ही प्रामाणिकपणे भांडलो, हे आम्ही खुलेमनाने मान्य करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूत्र म्हणून ते अमान्य करणे जमणार नाही. देव, देश आणि धर्म या मुद्यांवर आम्ही प्रामाणिकपणे भांडलो. मात्र, युतीसाठी आजवर त्याग केलेल्या महापुरुषांनी दाखविलेला सन्मार्ग सोडून एकटे लढलो तर पाकिस्तानचे हस्तक म्हणून वागणारे पुन्हा मानगुटीवर बसतील. हे तुम्हाला चालणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने याच हॉलमध्ये शेतकर्‍यांची परिषद घेऊन कर्जमाफीची मागणी केली. तसेच नाणार प्रकल्प रद्द करण्याची शिवसेनेची भूमिका मुख्यमंत्र्यांनी एका क्षणात मान्य केल्यामुळे आमचे सगळे प्रश्न मार्गी लागल्यानंतर युतीचे मतभेद मिटल्याने लोकसभेसाठी युती झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, माजीमंत्री एकनाथ खडसे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, खासदार संजय राऊत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, मिलिंद नार्वेकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.

आघाडीचा पंतप्रधान कोण?

नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशात स्थिर सरकार देण्याचा युतीचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, आमच्या युतीला विरोध करणार्‍या आघाडीने त्यांच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ते जाहीर करावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात दिले.

उद्धव ठाकरे उवाच

First Published on: March 18, 2019 9:44 AM
Exit mobile version