सिन्नर तालुक्यातील गावांना हादरे, समृद्धीच्या कामासाठी विनापरवानगी सुरूंग स्फोट

सिन्नर तालुक्यातील गावांना हादरे, समृद्धीच्या कामासाठी विनापरवानगी सुरूंग स्फोट

समृद्धी महामार्गासाठी आवश्यक दगडांसाठी स्फोट घडवले जात आहेत.

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील कामांना वेगाने सुरुवात झाली आहे. या कामांसाठी मोठया प्रमाणावर गौण खनिज, दगड, माती, मुरुमाची आवश्यकता आहे. याकरिता संबधित ठेकेदाराकडून परिसरात खोदकाम सुरू करण्यात आले आहे. याकरिता सिन्नर तालुक्यातील वावी परिमंडळात कंपनीने प्रकल्प स्थापन केला असून जमिनीतून दगड काढण्यासाठी सुरूंगाचे स्फोट घडवले जात आहेत. या स्फोटांमुळे आजूबाजूच्या चार ते पाच गावांना हादरे बसत आहेत. या हादर्‍यांनी नागरिक भयभीत झाले असून दोन दिवसांपूर्वी या हादर्‍यांनी काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे महसूल विभागाकडून खोदकामासह स्फोटांसाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नागपूर मुंबई या ७१० किलोमीटरच्या महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात १२९० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. नाशिकमधून जाणार्‍या १०० किलोमीटरच्या रस्त्यासाठी ३ टप्पे तयार करण्यात आले आहेत. यात टप्पा क्रमांक १२ अंतर्गत पाथरे ते सोनारीचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीला देण्यात आले आहे. या महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी, रस्ते विकास महामंडळाच्या मालकीच्या असून महामार्गाच्या उभारणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराकडे त्या हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. या जमिनीचा ताबा घेत ठेकेदाराकडून संपादित केलेल्या जमिनीच्या सपाटीकरणासह मार्गात येणारी झाडे, कच्ची पक्की बांधकामे हटवण्याच्या कामाला गेल्या गेल्या दोन महिन्यांपासून सुरुवात करण्यात आली आहे. संबधित ठेकेदाराकडून गोंदे व वावी येथे यंत्रसामग्रीची जुळवाजुळव करण्यात येत आहे. महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारा दगड उपलब्ध करण्यासाठी ठेकेदाराकडून परिसरात अनेक ठिकाणी खासगी शेतजमीन मिळकती खरेदी करण्यात आल्या असून तेथे खोदकाम करून दगड काढण्यात येणार आहे. या ठिकाणी ५० ते ७० फुटापर्यंत खोल खाणी यामुळे निर्माण होणार आहेत. दोन दिवसांपासून वावी सायाळे रस्त्यालगत खरेदी केलेल्या जमिनीत समृद्धी ठेकेदाराकडून दगड काढण्यासाठी सुरूंगांचे स्फोट करणे सुरू झाले. या कामामुळे वावी, दुशिंगवाडीच्या परिसरातील रहिवाशांना भूकंपाप्रमाणे हादरे बसत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. स्फोट झाल्यावर हादरे बसून घरातील भांडी खाली पडण्याचे प्रकारही घडत असल्याच्या तक्रारी आहेत.

रहिवाशी म्हणतात…

या परिसरात जमिनीत सुरूंग लावून स्फोट घडवले जातात. यामुळे भूगर्भातील पाण्याचा स्त्रोत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरीही कोरडया ठाक होतील. आधीच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असताना आता या कामामुळे येथील जलस्त्रोत धोक्यात सापडले आहेत. – अजित गोराणे, स्थानिक रहिवासी

स्फोटांमुळे कहांडळवाडी, वावी, दुशिंगवाडी या गावांना धक्के बसत आहेत. माझे पोल्ट्री शेड असून दोन दिवसांपूर्वी या धक्क्यांनी पाच कोंबडयाही मृत पावल्या. परिसरातील काही घरांना तडेही गेले. – कानिफनाथ घोटेकर, स्थानिक रहिवासी

First Published on: January 30, 2019 2:39 PM
Exit mobile version