निवडणूक कामात हलगर्जीपणा; दोघांवर गुन्हा

निवडणूक कामात हलगर्जीपणा; दोघांवर गुन्हा

प्रातिनिधीक फोटो

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गास एका महिलेने दांडी मारत दुसर्‍या व्यक्तीला हजर राहण्यास सांगून नावापुढे सही करण्यास सांगितले. मात्र, महिलेच्या नावासमोर पुरुष व्यक्ती सही करत असल्याचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या लक्षात आले. ही घटना ९ एप्रिलला दादासाहेब सभागृहात घडली. याप्रकरणी अनिल वसंत दौंडे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत विजय थोरात, संगीता विजय पराते (जिल्हा व्यवस्थापक, रोहिदास चर्मउद्योग व कर्मचारी विकास महामंडळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल वसंत दौंडे हे १२४ नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाचे काम पाहत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०१९ चा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार दौंडे यांनी दादासाहेब गायकवाड सभागृहात मतदानप्रक्रियेसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला. त्यावेळी संगीता पराते प्रशिक्षणास हजर राहिल्या नाहीत. प्रशांत थोरात प्रशिक्षणास हजर राहिला व त्याने हजेरी रजिस्टरवर संगीता पराते यांच्या नावासमोर सही केली. चौकशीत थोरात याने संगीता पराते यांच्या सांगण्यावरून प्रशिक्षण वर्गास हजर राहून सही केली असल्याचे सांगितले. निवडणूक कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याप्रकरणी दौंडे यांनी तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे तपास करीत आहेत.

First Published on: April 21, 2019 10:00 PM
Exit mobile version