पहिल्याच दिवशी हरकतींचा पाऊस

पहिल्याच दिवशी हरकतींचा पाऊस

कर्मवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था

नाशिकमधील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध होताच हरकतींचा पाऊस पडला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 24 हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती नोंदवण्यासाठी गुरुवार (दि.27) पर्यंत अंतिम मुदत असल्याचे निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी सांगितले.

नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून सोमवारी मतदारांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली. यावर 24 हरकती प्राप्त झाल्या. यात प्रामुख्याने नाव, पत्ता बदल असे आक्षेप आहेत. मृत सभासदांची नावे वगळण्याचे अर्ज प्राप्त झाले आहेत. 27 तारखेपर्यंत त्यावर हरकती नोंदवता येतील. 29 जून रोजी मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून ज्या सभासदांना हरकती असतील, तसेच मृत सभासद असल्यास त्यांनी अर्ज द्यावा, असे आवाहन निवडणूक मंडळाने केले. तथापि, संस्थेच्या महत्वाच्या पदांमध्ये सहा विश्वस्त व संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व सहचिटणीस या चार जागांचा समावेश आहे. कार्यकारी मंडळात एकूण 19 सदस्य असून, त्यात सिन्नर 3, निफाड व चांदवड 3, येवला व मालेगाव 2, नांदगाव, बागलाण, कळवणला 2, दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुक्यात 3 जागा आहेत. नाशिक शहर व इगतपुरी तालुक्यात 4 आणि महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत.

बिनविरोधसाठी पुढील आठवड्यात बैठक

संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी बहुतांश सभासदांची इच्छा आहे. यासाठी अनेक सभासदांनी निवडणूक खर्च न करता बिनविरोध करा, अशा सूचना केली आहे. यासाठी सभासदांची बैठक आयोजित करणार आहे. याकरता समाजातील जेष्ठ व श्रेष्ठ सभासदांची चर्चा सुरू आहे. पुढील आढवड्यात ही बैठक घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी सांगितले.

First Published on: June 25, 2019 8:45 AM
Exit mobile version