वसाकाच्या गळीत हंगामाला मोळी पूजन सोहळ्याने प्रारंभ

वसाकाच्या गळीत हंगामाला मोळी पूजन सोहळ्याने प्रारंभ

देवळा – वसाकाच्या खडतर अवस्थेत हा कारखाना ३५ वर्षे त्याच्या जीवात जीव राहील एवढी मेहनत तुम्ही घेऊन खऱ्या अर्थाने संभाळून ठेवला. म्हणून आज तो चालू करता आला. आता ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी वसाकाच्या ३५ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम मोळी पूजन समारंभाप्रसंगी केले.
धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर-२ संचालित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम मोळी पूजनाचा सोहळा शनिवारी (दि.१७) आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. राहुल आहेर पुढे म्हणाले की, वसाका धाराशिव साखर कारखाना पहिल्या वर्षी चालू करायला घेतला तेव्हा आपण कारखाना दोन तीन वर्षे रुळावर येण्यासाठी लागतील, असे सांगितले होते. स्व. दौलतराव आहेर यांनी कारखाना सोडला तेव्हा विक्रमी गाळप झाले होते. कारखानाही सुस्थितीत होता. सिस्टलरीमध्ये आर एस शिल्लक होते. तसेच, गोदाम भरून एक लाख पोती साखर बाहेर होती. मोठ्या प्रमाणात कार्यक्षेत्रात ऊस असल्यामुळे एक ते दीड लाख टन ऊस शिल्लक राहिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषला बळी पडावे लागल्याने पॅनल पडले. ते सोन्याचे दिवस परत बघायचे असतील तर सर्व घटकांनी संघटितपणे एकत्र येणे गरजेचे आहे. कारखाना सुरळीत चालला तर कार्यक्षेत्रात निश्चितच ऊस उत्पादन व गाळपही वाढेल. बाहेरून ऊस आणण्याची गरज भासणार नाही . तसेच, कारखान्याला मागीलवेळी ज्यांनी ऊस दिला त्या उत्पादक शेतकऱ्यांना राहिलेल्या फरकाची रक्कम टप्याटप्याने अदा करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बोरसे, अवसायक राजेंद्र देशमुख, अविनाश महागावकर, चेअरमन अभिजित पाटील, कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. बॉयलर पूजन जितेंद्र पाटील, टर्बाईन मशीन पूजन आनंदा शेलार, काटा व गव्हाण पूजन भाऊसाहेब देवरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, बाळासाहेब बच्छाव, संतोष मोरे, विलास निकम, भरत पाळेकर, माणिक देवरे, अशोक चव्हाण, माणिक निकम, भाई पाटील, अशोक निकम, बापू देवरे, शशी निकम, राजेंद्र पवार, नंदू खैरनार, विलास मोहन, राजू निकम, कार्यकारी संचालक सत्यजित कडे, रवीराजे देशमुख, दत्तात्रय फडतरे, दिनेश देवरे, महेंद्र हिरे आदीसह ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. अमर पाटील यांनी आभार मानले.

First Published on: October 17, 2020 10:05 PM
Exit mobile version