नाशिक वा नगरचे पालकत्व स्वीकारण्यास तयार : विखे

नाशिक वा नगरचे पालकत्व स्वीकारण्यास तयार : विखे

पालकमंत्री म्हणून कोणाला कोठे नियुक्त करावे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मला नाशिक किंवा अहमदनगर यापैकी कुठलीही पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली, तर अवश्य पार पाडू, अशी इच्छा राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी व्यक्त केली.

नाशिकमध्ये विखे- पाटील यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य ध्वजारोहण सोहळा झाला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जळगावचाही पदभार असल्याने नुकतेच भाजपात प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे विखेंना ध्वजारोहणाची जबाबदारी ही ही भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना या चर्चेला उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर विखे- पाटील म्हणाले, नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात. मात्र, मला जबाबदारी दिल्यास नाशिक अगर नगर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारायला आवडेल अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. जिल्ह्याच्या पालकत्वाच्या नात्याने ध्वजारोहणाचा मान हा मंत्र्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय असतो. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले विखे- पाटील यांना ही संधी मिळाली. दोन जिल्ह्यांचे पालकत्व निभावणार्‍या महाजन यांनी जळगावला प्राधान्य दिले. त्यामुळे महाजन यांच्या जागी विखे- पाटील यांना मान मिळाला. आगामी काळात महाजन यांना जळगावच्या राजकारणात रस असेल, हे यातून स्पष्ट होते, तर नाशिकच्या राजकारणात विखेंचा दबदबा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वतःला फार ज्ञानी समजू नका

राज्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पुरामुळे नुकसान झाले आहे. शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा वेळी सरकार चांगले काम करीत आहे, असे सांगून काही विरोधी नेते खूपच ज्ञानी असल्यासारखे वागत असतात. त्यात काही विशेष नाही, असे सांगत त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. पवार यांनी नुकताच पुरग्रस्त भागाचा दौरा केला. पूरपरिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकारमधील लोकांना अशा परिस्थितीला तोंड देण्याचा अनुभव नाही, अशी टीका त्यांनी केली होती.

First Published on: August 16, 2019 11:59 PM
Exit mobile version