‘पदवीधर’मतदारसंघासाठी 30 जानेवारीला मतदान

‘पदवीधर’मतदारसंघासाठी 30 जानेवारीला मतदान

नाशिक : नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार असून, २ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील पदवीधर व्यक्ती मतदान करतात. पाच जिल्ह्यांचा अवाढव्य मतदारसंघ पिंजून काढताना भल्याभल्या उमेदवारांची भंबेरी उडते. त्यात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात भौगोलिकदृष्ठ्या सर्वाधिक मतदारांची नोंदणी होत असल्याने याच जिल्ह्यांतील उमेदवारांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विजयाची हॅटि्ट्रक २०१७ मध्ये पूर्ण केली. त्यांना पराभूत करुन पुन्हा गड मिळवण्यासाठी भाजपचे महसूलमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

भाजप नेते उत्तमराव पाटील हे दोन वेळा या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर, ना. स. फरांदे हेदेखील भाजपच्याच चिन्हावर दोन वेळा विधानपरिषदेत पोहोचले. त्यामुळे भाजपचा मतदारसंघ म्हणूनही काही काळ पदवीधर मतदारसंघाची ओळख बनली होती. माजी खासदार प्रतापदादा सोनवणे हे दोन वेळा पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले असताना त्यांनी खासदारकी मिळवली. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी विजय मिळवला.

त्यानंतर सलग दोनवेळा त्यांनी मतदारसंघात कुणालाही प्रवेश करू दिलेला नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रिय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे जावई डॉ. प्रशांत पाटील यांनी ही निवडणूक लढवली. भाजपचा करिष्मा कायम राहिल, असे वाटत असताना काँग्रेसने सामुहिकरित्या प्रयत्न करत ४० हजार मतांनी ही निवडणूक जिंकली. नाशिकमधून क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक (व्ही. एन. नाईक) शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, डॉ. प्रशांत पाटील तर, धुळ्यातून धनंजय विसपुते, राजेंद्र विखे पाटील हे तयारी करत असल्याचे दिसते. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. सुधीर तांबे यांनी नव्याने तयारी सुरू केली आहे. तीन वेळा या निवडणुकीचा अनुभव असलेल्या डॉ. सुधीर तांबे यांना पराभूत करण्याचे खर्‍या अर्थाने आता भाजपसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

First Published on: December 30, 2022 12:38 PM
Exit mobile version