वडनेरला ५० झाडांची विनापरवानगी कत्तल

वडनेरला ५० झाडांची विनापरवानगी कत्तल

नाशिक : नाशिकरोडच्या वडनेर गाव, वडनेर गेट परिसरात वड, पिंपळ, आंबा, कडुनिंबासह सुमारे 50 झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकासह उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांच्यावर वृक्षतोड कायदा, वन्यजीव कायदा, लोकप्रतिनिधी कायदा तसेच फौजदारी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी नाशिक कृती समितीच्या अश्विनी भट, कर्तव्यशील सामाजिक संस्थेचे वैभव देशमुख व अन्य वृक्षप्रेमींनी केली आहे.

वृक्ष तोडणार्‍या ठेकेदारामुळे वडनेर परिसरातील वीज चार दिवस खंडीत होती. त्याची भरपाई नगरसेवकाकडून करून घ्यावी, नवीन कायद्यानुसार एक झाड तोडल्यास एक लाख दंड असा पन्नास वृक्ष तोडल्याप्रकरणी पन्नास लाखाचा दंड नगरसेवक, ठेकेदाराकडून वसूल करावा, उद्यान विभागांचे टेन्डर वाटप व कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावणप्रेमींनी केली आहे. संबंधित ठेकेदाराने आपल्या ट्रकवर अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावला होता, हे धक्कादायक आहे.

वडनेरच्या वृक्षतोडीबाबत कारवाईसाठी विभागीय आयुक्त, महापालिका आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडे पाठपुरावा सुरू आहे. आदित्य ठाकरेंकडे ट्विटरद्वारे तक्रार करण्यात आली आहे. लवकरच त्यांची भेट घेतली जाणार आहे. उद्यान निरीक्षक शेख यांनी सांगितले की, वडनेरची 36 झाडे तोडल्याप्रकरणी एकूण 20 लाख 35 हजार दंड वसूलीची नोटीस देण्याची प्रक्रिया सुरु केली असून सात दिवसांत उत्तर न दिल्यास सराईत ठेकेदार उत्तम सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

वडनेर गाव आणि हांडोरे लॉन्ससमोरील दोन अशी चार डेरेदार झाडे तसेच वडनेरगेट ते पाथर्डी रोडवरील चाळीसहून अधिक झाडे नगरसेवकांनी बेकायदेशीरपणे तोडल्याचे दिसून आले. तीस मजूरांच्या मदतीने झाडे तोडणार्‍या या ठेकेदार व नगरसेवकाकडे महापालिका, वृक्षप्राधिकरणाची परवानगी नव्हती. हायकोर्टाचे सर्व निकष त्यांनी पायदळी तुडवल्याचे दिसून आले. ठेकेदार व मजूरांनी विचारणा केली असता नगरसेवक पोरजे यांनी सांगितल्याची वाच्यता केली. मात्र, वेळीच हस्तक्षेप केल्याने पर्यावरणप्रेमींनी पोलीस व वनखात्याच्या मदतीने अन्य झाडे वाचवली.

यातील इलेक्ट्रिक कटर व अन्य साहित्य उपनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा, अमरधाम सेवार्थ असे लिहिलेल्या टाटा ट्रकसह (एमएच 04 सीपी 9196) ठेकेदार उत्तम तुकाराम सोनवणे फरार झाला. या ठेकेदाराने या आधीही नाशिकरोडच्या झुलेलाल पतसंस्थेशेजारी पिंपळ, औंदुंबरची झाडं तोडली होती. याची तक्रार नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले आहे.

वृक्षतोडीत भ्रष्टाचार : वृक्षप्रेमींनी महापौर सतीश कुलकर्णी यांना तसेच मनपा आयुक्त, उद्यान उपायुक्त, उद्यान निरीक्षक यांना सातत्याने फोन केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. नंतर महापौरांनी कारवाईचे केवळ आश्वासन दिले. काठे गल्लीतही नगरसेवकाच्या पतीने नुकतीच अवैध वृक्षतोड केली. पर्यावरणप्रेमींनी पकडल्यानंतर ही लाकडे महापालिकेकडे जमा करण्यात आली. पेठरोडवर नगरसेवक तसेच नगरसेविकाचा पती यांनी घरमालकाचा विरोध असतानाही मोठे झाड तोडले. गंगापूरोडवरही नगरसेवकांच्या दबावाने झाडे तोडण्यात आली. आता त्याजागी पार्किंग, अनधिकृत फेरीवाले आले आहेत. जेलरोड-टाकळीरोडवर व्यावसायिकाने शेतातील 120 झाडे तोडली. पर्यावरणप्रेमींनी पोलीस व उद्यान निरीक्षकांना बोलावून पंचनामा केला. व्यावसायिकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, कारवाई झाली नाही. आता शेतातील राहिलेली झाडेही तोडली गेली आहेत. नाशिकरोडला महिलेने स्वतःच्या पेरूच्या झाडाच्या फांद्या तोडल्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र पिंपळ, औदूंबर तोडणार्‍या उत्तम सोनवणे या ठेकेदाराला नागरिकांनी रंगेहाथ पकडून देऊनही कारवाई झाली नाही.- वैभव देशमुख, पर्यावरणप्रेमी तथा कर्तव्यशील सामाजिक संस्था सदस्य

First Published on: January 14, 2022 8:15 AM
Exit mobile version