महापालिकेच्या अधिकार्‍यांना गढूळ पाण्याच्या बॉटल भेट

महापालिकेच्या अधिकार्‍यांना गढूळ पाण्याच्या बॉटल भेट

नाशिक : जुने नाशिक परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने त्याविरोधात भारतीय विद्यार्थी सेनेने उपरोधिक आंदोलन केले. गढूळ पाण्याने भरलेल्या पाण्याच्या बॉटलवर ‘फडणवीस मिनिरल वॉटर’ असे लेबल लावत महापालिकेच्या विभागीय अधिकार्‍यांना भेट दिले. एमजी रोडवरील महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करत महापौर व नाशिकला दत्तक घेणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्यात आला. येत्या दोन दिवसांत जुने नाशिकला पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यान महापौर सतिश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागूल व भाजपच्या पदाधिकार्‍यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव ठाकरे, महानगर संघटक योगेश बेलदार यांनी दिला.
जुने नाशिकमधील जुनी तांबट लेन, पारसनाथ लेन, संभाजी चौक, म्हसरूळ टेक, शिवाजी चौक, तिवंधा लेन, टाकसाळ लेन, बडी दर्गा, पाटील गल्ली, नाव दरवाजा, सोमवार पेठ, भद्रकाली या परिसरात अनेक दिवसांपासून नेहमी कमी प्रमाणात पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. त्यावर कारवाई करत महापालिकेने पाणी सोडले. परंतु, काळ्या पाण्याची शिक्षा नागरिकांना सहन करावी लागत आहे. जुने नाशिक परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने कोरोना साथरोगाच्या काळात अधिक आजार बळावण्याची शक्यता आहे. याविषयी रहिवाश्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तत्काळ कारवाई न झाल्यास आदोलनाचा इशारा युवासेनेचे जिल्हा चिटणीस गणेश बर्वे यांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून जुने नाशिक परिसरात पाणीप्रश्नी तक्रारी करूनसुद्धा मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

First Published on: July 12, 2021 3:29 PM
Exit mobile version