सात हजार पाणी स्त्रोतांचे जिओटॅगिंगच्या माध्यमातून स्वछता अभियान

सात हजार पाणी स्त्रोतांचे जिओटॅगिंगच्या माध्यमातून स्वछता अभियान

नाशिक : दुषित पाण्यापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने यावर्षीही जिल्ह्यातील जलस्त्रोतांची मोबाइलद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. 11 एप्रिलपासून सुरु झालेल्या या अभियानात आतापर्यत 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे अभियान 31 मेपर्यंत असून जिल्ह्यातील सर्व 7354 स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करुन त्याचे जिओ टॅग करण्यात येत आहे. दरम्यान, इगतपूरी तालुक्यातील 7 पाण्याचे स्त्रोत हे धरणांच्या पाण्यात असल्याने पाण्यातून जात स्त्रोतांपर्यत पोहचून येथील पाण्याचे नमूने घेऊन जिओ टॅग करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष हा उपक्रम राबवित असून, या कक्षाच्या पाणी गुणवत्ता शाखेकडून शुद्ध निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे 7354 जलस्त्रोत असून, या सर्व स्त्रोतांच्या पाणी नमूण्यांची तपासणी भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेमार्फत करण्यात येत आहे. रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात 100 टक्के पूर्ण करण्यात यावे. या बाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार हे अभियान यशस्वी करण्यासाठी पाणी व स्वच्छता विभाग व आरोग्य विभाग यांच्यामार्फत काम करण्यात येत आहे.

सध्यस्थितीत जिल्हयाचे 98 टक्के काम पूर्ण झाले असून महाराष्ट्रात नाशिक जिल्हयाचे सर्वाधिक काम झालेले आहे. या अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाईलद्वारे नमुने गोळा करण्यात येत आहेत. नमुन्यांची रासायनिक तपासणी उपविभागीय प्रयोग शाळांतून करण्यात येत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली.

First Published on: May 23, 2022 12:22 PM
Exit mobile version