शिक्षकांना आज मिळणार वेतनातील फरक?

शिक्षकांना आज मिळणार वेतनातील फरक?

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करताना आमदार किशोर दराडे व शिक्षक.

नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांना जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत वेतनातील फरक देण्याचे आश्वासन देऊन रजेवर निघून गेलेल्या अधीक्षकांविरोधात शिक्षकांनी सोमवारी (दि.२७) विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन केले. शिक्षक आमदार यांनी वेतन पथक अधिकार्‍यांना सज्जड दम दिल्यानंतर त्यांनी मंगळवारी (ता.28) फरक देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, शिक्षक आमदारांच्या दबावापोटी आश्वासन मिळाले असले, तरी एका दिवसात खात्यावर पैसे वर्ग होणार का, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून आहे.

शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्या नाशिकरोड येथील कार्यालयासमोर सोमवारी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह शिक्षकांनी आंदोलन केले. शिक्षकांना वेतन बिलातील फरक द्या, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शालार्थ आयडी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शिक्षक सकाळपासून येथे उपस्थित होते. शिक्षण उपसंचालकांनी वेतन पथकास फोन करून याविषयी विचारणा केली. मात्र, वारंवार उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने आमदार दराडे यांनी स्वत: फोन लावत येथील अधिकार्‍यांना झापले. त्यांच्या दबावापोटी मंगळवारी फरक देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आमदार किशोर दराडे, विभाग टीडीएफचे अध्यक्ष हिरालाल पगडाल, आर. डी. निकम, एस. बी. शिरसाट, मोहन चकोर, जीभाऊ शिंदे, एस. बी. देशमुख, दिनेश अहिरे, पुरुषोत्तम रकीबे, दशरथ जारस, सखाराम जाधव, सचिन शेवाळे, जयेश सावंत, सचिन देशमुख, आशिष पवार, संतोष निकम आदी उपस्थित होते.

उदय देवरे रजेवर

वेतनपथक अधीक्षक उदय देवरे यांनी शिक्षकांना आश्वासन दिले होते. मात्र, शिक्षकांना वेतनातील फरक न मिळाल्याने त्यांना सोमवारी आंदोलन करावे लागले. या आंदोलनाची चाहूल लागताच उदय देवरे हे ३१ मेपर्यंत रजेवर निघून गेले आहेत.

First Published on: May 28, 2019 7:20 AM
Exit mobile version