महिला अकाउंटंटने कंपनीला घातला १७ लाख ५० हजारांना गंडा

महिला अकाउंटंटने कंपनीला घातला १७ लाख ५० हजारांना गंडा

नोकरी सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांच्या नावे पगार दाखवून महिला अकाउंटंटने कंपनीला तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना मालिनी गार्डन, शरणपूर रोड, नाशिक येेथे घडली. याप्रकरणी योगेश अनर्थे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अकाउंटंटला अटक केली आहे. संशयित नेत्रांजली सागर वानखेडे (वय ३०, रा.पवन नगर, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित नेत्रांजली वानखेडे या महालसा अण्ड महल्सा कंपनीच्या कार्यालयात अकाउंट विभाग अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदावर नोकरीला होत्या. कंपनीकडून त्यांना विश्वासाने आर्थिक व्यवहार बघण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी कंपनीतर्फे चेकर व मेकर आयडी व पासवर्ड देण्यात आला होता. मात्र, संशयित वानखेडे यांनी स्वत:च्या फायद्यासाठी कंपनीच्या विविध शाखेतून नोकरी सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांच्या नावे पगार सुरु असल्याचे दाखवले. संशयित वानखेडे यांनी थत्तेनगर येथील कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत कंपनीच्या नावे असलेल्या खात्यातून वारंवार पैसे काढत १७ लाख ५० हजार २४ रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी संशयित वानखेडे यांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक काकवीपुरे करत आहेत.

First Published on: December 21, 2021 3:52 PM
Exit mobile version