कॅन्सरवर मात करण्यासाठी योगाचे धडे

कॅन्सरवर मात करण्यासाठी योगाचे धडे

कॅन्सरवर मात करण्यासाठी योगाचे धडे

कर्करोगाचे निदान झाल्यावरच रुग्ण मनाने खचून जातो& आता आयुष्य संपले, अशा भावनेने तो नैराश्याच्या गर्तेत अडकतो. वास्तविक, आधुनिक उपचार पद्धतीने कर्करोगावरही रामबाण उपाय होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन गंगापूररोड येथील नीता देशकर या कर्करोगग्रस्त महिलांच्या घरी जाऊन त्यांना विनामूल्य योग व प्राणायाम शिकवतात. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा अनुभव अनेकांचा आहे.

३७ वर्षे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये इमाने इतबारे नोकरी केल्यावर सेवानिवृत्तीचा काळ इतरांची सेवा करण्यात घालवण्याचा संकल्प नीता देशकर यांनी केला. त्यांनी योगशिक्षक पदविका प्राप्त केली आहे. १९९० पासूनच त्या योगा करीत आहेत. नोकरीमुळे वेळ कमी मिळत असल्याने त्या काळात केवळ एकच बॅच घेऊन त्या योगाचे प्रशिक्षण देत. सेवानिवृत्तीनंतर प्रशिक्षणासाठी पूर्णवेळ देऊ लागल्या. या प्रशिक्षणासाठी अन्य शिक्षक हजार रुपये शुल्क आकारत असताना देशकर या ही सेवा विनामूल्य देतात. योगाची खरी गरज ही महिलांना अधिक असते. बाळंतपणात त्यांच्या शरीराची मोठी झीज होते त्याचप्रमाणे अन्य शारीरिक बाबींमुळे त्यांच्या अशक्तपणा येतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी महिलांसाठी योगाची विनामूल्य प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात केली. स्त्री तंदुरुस्त असेल तर कुटुंब मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहते, असा विश्वास त्यांना आहे.

चाळिशीनंतरही महिलांना शारीरिक व्याधी होऊ नये म्हणून योग आणि प्राणायाम करणे गरजेचे असल्याचे त्या सांगतात. योगाचे प्रशिक्षण देत असतानाच त्यांना काही कर्करोगग्रस्त महिलांची माहिती मिळाली. या महिला आजारपणामुळे खचल्या होत्या. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती, अशा महिलांचे समुपदेशन करून त्यांना प्राणायाम शिकवण्याचे मोठे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. आजवर असंख्य महिला रुग्णांची त्यांनी योगाचे प्रशिक्षण दिले आहे.

महिलांसाठी योग जीवनसंजीवनी

महिलावर्गाला प्रामुख्याने कंबरदुखी, गुडघेदुखी, चरबी वाढणे, स्नायू दोष यांसारखे आजार उद्भवतात. योग आणि प्राणायामाने या आजारांवर मात करता येते. अमेरिकेतील काही संशोधकांच्या मते योगाने कर्करोगावर मात करता येते. एकीकडे अ‍ॅलोपॅथीचे उपचार सुरू असताना दुसरीकडे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाही सुरू ठेवल्यास रोगप्रतीकारशक्ती वाढते, असे डॉक्टर सांगतात. शारीरिक आणि मानसिक तणाव तसेच थकव्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये अशक्तपणा येतो. शवासन, सेतुबंधासन, वीरभद्रासन यामुळे शरीराचे तापमान वाढते. हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतात आणि रक्तदाबावरही नियंत्रण आणता येते.

First Published on: June 21, 2019 4:36 PM
Exit mobile version