जिल्हा परिषदेची अडकली शंभर कोटींची कामे

जिल्हा परिषदेची अडकली शंभर कोटींची कामे

नाशिक लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्हा परिषदेची पाणी पुरवठा योजना व जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर रस्त्यांची सुमारे १०० कोटी रुपयांच्या कामांना एका क्षणात ब्रेक लागला आहे. अनेक दिवसांपासून सदस्य पाठपुरावा करत असलेल्या रस्त्याची कामे अखेर आचार संहितेच्या कात्रीत अडकल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी (ता.१०) सायंकाळी पाचपासून आचारसंहिता लागू झाली. पुढील अडीच महिने संपूर्ण देशात आचारसंहिता लागू राहणार असल्यामुळे आता कोणत्याही नवीन कामांना मंजूरी मिळणार नाही. प्रशासकीय मंजूरी झालेली कामे पूर्ण केली जातील. यात विशेषत: जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिलेल्या रस्त्यांच्या कामांचा समावेश होतो. लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत होणार्‍या रस्त्यांचे नियोजन अनेक दिवस रखडल्यामुळे सुमारे ५० कोटींची कामे आचारसंहितेच्या कात्रीत सापडली. बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी अनेक दिवस नियोजन रखडवल्यामुळे ही कामे आचारसंहितेपर्यंत रखडली. अन्यथा तत्पूर्वी मान्यता मिळून आजवर प्रशासकीय मान्यता होऊन कार्यारंभ आदेश दिले असते, अशी नाराजी काही सदस्यांनी व्यक्त केली. तसेच पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी बहुतांश कामांना प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे या योजनांचे काम आचारसंहितेनंतर केले जाईल. त्यांना अडीच महिन्यांचा अवधी द्यावा लागणार असल्यामुळे आता सर्वच सदस्यांना प्रतीक्षा करावी लागेल. बहुतांश किरकोळ कामांना तत्काळ मंजुरी दिल्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. प्रशासकीय मान्यता झालेली कामे पूर्ण करून घेण्याकडे आता सर्वांचा कल राहणार आहे.

अधिकार्‍यांवर भार

गेल्या आठवड्यात बांधकाम विभागामध्ये ठेकेदारांनी एकच गर्दी केल्याने या विभागाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीते नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेरगावी होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिला लांडगे आजारी असल्याने सुटीवर आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार प्रभारी अधिकारी मोरे यांच्याकडे सोपवण्यात आला. महत्वाच्या दिवशी अधिकारी भेटत नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांमध्ये खदखद सुरू झाली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जे. सोनकांबळे यांच्याकडे शेकडो फायली दाखल होत असल्याने त्यांना दिवसरात्र एक करावी लागली.

First Published on: March 11, 2019 12:22 AM
Exit mobile version