साहित्य संमेलनातून नाशिकचे ‘ब्रॅण्डिंग’

साहित्य संमेलनातून नाशिकचे ‘ब्रॅण्डिंग’

नाशिक शहरात होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी आहे. नाशिकचे नाव उंचावले तर लोक नाशिकला येतील. त्यातून नाशिकचे अर्थचक्र सुधारेल. संमेलन ही प्रत्येकाचा जबाबदारी समजून कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. सारस्वतांच्या मेळा अधिक दर्जेदार करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आयोजकांनी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या.

संमेलन स्थळ कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी येथे तयारीच्या दृष्टीने पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी आढावा घेतला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी करून तेथे करण्यात आलेल्या सेवासुविधांची माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी अधिकार्‍यांना दिली.

यावेळी महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, बांधकाम विभागाचे सिद्धार्थ तांबे, महामार्ग प्राधिकरणचे दिलीप पाटील, नोडल अधिकारी नितीन मुंडावरे, विश्वास ठाकूर, शंकर बोर्‍हाडे, रवींद्र पगार, दिलीप खैरे, डॉ.शेफाली भुजबळ,संजय करंजकर आदी उपस्थित होते.

माहितीपत्रकातून मिळणार पर्यटनाची माहिती

साहित्य संमेलनास देशभरातून साहित्यिक व रसिक येणार आहेत. त्यांना नाशिक शहर व जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देता यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने माहितीपत्रक उपलब्ध करुन द्यावे. त्यामध्ये त्र्यंबकेश्वर, वणीसह पर्यटनस्थळांची नावे, किलोमीटर आणि ये-जा करण्यासाठी सुविधांची माहिती द्यावी, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना दिली. त्यानुसार आता माहितीपत्रक तयार केले जाणार आहे.

भुजबळांनी अशा केल्या सूचना

नाशिक शहरातील चौकांचे सुशोभिकरण करा.
शहरातील रस्त्यांची साफसफाई करावी.
१४ ठिकाणांहून शटल बससेवा उपलब्ध करा.
संमेलनस्थळी प्रथमोपचारासाठी रग्णवाहिका व डॉक्तरांची व्यवस्था करा.
नाशिक महापालिकेने संमेलनस्थळी ज्यादा पाण्याची व्यवस्था करावी.
मुंबई-आग्रा महामार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती करा.
उड्डाणपूल बोगद्याच्या रस्त्यावरचे खड्डे बुजवा.
महामार्गालगतच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या दुरुस्त करा.
महावितरणने अखंडित वीजपुरवठा करावा.
संमेलनस्थळी एअरटेल, आयडीया-व्होडाफोन, जिओची रेंज द्यावी.

First Published on: November 15, 2021 8:14 PM
Exit mobile version