फडणवीसांना भेटल्यानंतर अधिकारी मंत्र्यांवर आरोप करतात, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

फडणवीसांना भेटल्यानंतर अधिकारी मंत्र्यांवर आरोप करतात, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दिल्ली येथे आयपीएस आणि मुंबई येथेही काही अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मविआच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्रसरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्याने ईडी व सीबीआय या एजन्सींच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. सुप्रीम कोर्टानेही ईडी व सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजपचे हे राजकारण जनता बघत असून येत्या काळात जनताच याचं उत्तर देईल असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

अधिकारी भेटणं गैर नाही

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मलिक यांच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी अनेक वर्षे सत्तेत आणि विरोधात होतो. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा सर्व अधिकारी मलाही भेटत होते. मी एखादी गोष्ट सांगितली. ती योग्य असेल तर ते नाही म्हणायचे नाही. लोकशाहीमध्ये अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवणं यात गैर नाही. पण अधिकाऱ्यांचा गैरवापर होत असेल तर ते चुकीचं आहे. अधिकारी माजी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षांना भेटले तर त्यात गैर नाही. उद्या पृथ्वीराज चव्हाणांना भेटले तरीही गैर नाही, त्याची चिंता करण्याची गरज नाही. अधिकारी सर्व काही व्यवस्थित ओळखत असतात. त्यांना सर्व समजतं. केव्हा, कधी, कशा पद्धतीने पावलं टाकावी, हे अधिकाऱ्यांना समजतं, असं शरद पवार म्हणाले.

 

First Published on: September 7, 2021 3:14 PM
Exit mobile version