मविआला पुन्हा धक्का! सर्वोच्च न्यायालयाने नवाब-देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारला

मविआला पुन्हा धक्का! सर्वोच्च न्यायालयाने नवाब-देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारला

विधान परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आजची निवडणूक रंगतदार ठरणार आहे, कारण महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून दुसऱ्या उमेदवारासाठी अधिक काळजी घेतली जात आहे. यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मतदानाचा अधिकार नाकारत याचिका फेटाळली.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. शेवटच्या अर्ध्या तासात तरी निकाल आपल्या बाजुने लागला तरी विधान भवनात पोहचण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत मतदानाचा अधिकार नाकारला आहे.

हेही वाचा : लोकशाहीला मालक निर्माण झाले आहेत, संजय राऊतांचा भाजपला टोला

दरम्यान, मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एका दिवसासाठी जामीन मिळावा, या अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळीसुद्धा अंमलबजावणी संचालनालयाने याला विरोध केला होता. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं सुनावणीदरम्यान ईडीने न्यायालयात सांगितलं होतं. त्यांच्या याचिकेवर विशेष न्यायालयात सुनावणी झाली होती. मात्र, त्यांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता. तर, आता महाविकास आघाडीच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.


हेही वाचा : मोठी बातमी! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी नाकारली


 

First Published on: June 20, 2022 3:39 PM
Exit mobile version