नवाब मलिकांनी घेतली मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट, NCB कारवाईवरील आरोपांवर SIT चौकशीची मागणी

नवाब मलिकांनी घेतली मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट, NCB कारवाईवरील आरोपांवर SIT चौकशीची मागणी

राज्यभरात देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचा उद्योग भाजपकडून सुरू - नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे. समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांची एसआयटी चौकशी कऱण्यात यावी अशी मागणी नवाब मलिक यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. चौकशी सुरु असून गुन्हा दाखल झाल्यास योग्य कारवाई करु असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलं आहे. तसेच दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलं असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. एनसीबीच्या कारवाईबाबत अनेक तक्रारी येत आहेत. या सर्व तक्रारींनुसार गुन्हा दाखल करुन योग्य कारवाई करु असे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली आहे. मलिक म्हणाले की, दोन दिवस नांदेड, परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्यात क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. एनसीबीच्या पंचाने जे आरोप करुन प्रकरण समोर आणलं आहे ते धक्कादायक आहे. मी केलेल्या आरोपांमध्ये भर देणारा हा प्रकार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

योग्य कारवाई करण्याचे आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एनसीबी कारवाईवरील आरोपांची दखल घेतली आहे. बऱ्याच लोकांनी तक्रार केली आहे. याची पोलिसांकडून चोकशी सुरु करण्यात येत आहे. तपास करुन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन गृमंत्र्यांनी दिलं आहे. समीर वानखेडेंच्या नावाने एफआयआर दाखल होणार नसून घटनेवर होणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. या प्रकरणात सुरु असलेली खंडणी, फरार पंच प्रकरणात आरोपीला पकडतात, कोऱ्या कागदावर सही, तपास याबाबत एफआयआर दाखल करण्यात येऊन पोलीस सत्यता तपासून कारवाई करण्यात येणार आहे. पंचाच्या म्हणण्यानुसार चौकशी होणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एनसीबीच्या कारवाईवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यात घडत असलेल्या घटनांवर चिंता व्यक्त केली असल्याचे मलिक यांनी सांगितले. हॉलिवूड इंडस्ट्रीनंतर बॉलिवूड इंडस्ट्री मोठी आहे. इंडस्ट्री राज्यातील देशातील संस्कृती जगभर पोहचवत आहे. या इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा परिणाम झाला तर त्याचा लाखो लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल. इंडस्ट्री बदनाम झाली तर देशाचे नुकसान होईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.


हेही वाचा :  एनसीबीला धमकावणं अयोग्य, राज्यातील विषयांवर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप


 

First Published on: October 26, 2021 7:35 PM
Exit mobile version