समीर वानखेडेंनी जातीचा दाखला जाहीर करावा; नवाब मलिकांचं आव्हान

समीर वानखेडेंनी जातीचा दाखला जाहीर करावा; नवाब मलिकांचं आव्हान

मी शेअर केलेलं जन्म प्रमाणपत्र खोटं असेल तर खरं कोणतं आहे हे वानखेडे परिवाराने किंवा समीर वानखेडे यांनी स्वत: समोर येऊन दाखवावं. त्यांचे वडील जातीचं प्रमाणपत्र दाखवत आहेत. समीर वानखेडेंनी जात प्रमाणपत्र जाहीर करावं, असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे. तसंच, जर तुम्ही ते जाहीर केलं नाही किंवा सरकारी कागदपत्र नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे ती माहिती असते. सर्व कागदपत्र आम्ही बाहेर काढत आहोत. लवकरच हे प्रकरण जातपडताळणी समिती समोर जाईल, असं देखील नवाब मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले. “आम्ही बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या. मी एक स्पष्ट करतो की आमची लढाई एनसीबी या तपास यंत्रणेशी नाही आहे. गेली ३५ वर्षे एनसीबीने चांगलं काम केलं आहे. कधीच या संस्थांवर कोणी आरोप केले नाहीत. परंतु एक व्यक्ती जो फसवणूक करुन सरकार नोकरी मिळवतो, त्यावर आम्ही प्रश्न उपस्थित केले आहेत,” असं नवाब मलिक म्हणाले.

“गोष्टी जेव्हा समोर आणत आहोत, तर काहीजण नवाब मलिक एका अधिकाऱ्याचे खासगी जीवनातील माहिती सार्वजनिक करत असल्याची टीका करत आहेत. पती पत्नी, वडील, बहिण या सर्वांना यात खेचलं जात असल्याचं देखील म्हणत आहेत. परंतु आम्ही कोणाही बद्दल अभद्र असं काहीही केलेलं नाही. सोमवारी जन्माचा दाखला ट्विटरवर शेअर केला त्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या. मी काही हिंदू-मुस्लीम मुद्दा पुढे आणत नाही आहे. भाजपने या प्रकरणावरुन हिंदू-मुस्लीम असा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या सार्वजनिक जीवनात धर्माच्या नावावर राजकारण केलेलं नाही आणि लोकांना हे माहिती आहे. जो व्यक्ती बनावट जन्माचा दाखला तयार करुन सरकारी अनुसूचित जातीच्या श्रेणीमध्ये नोकरी मिळवतो यावर आम्ही प्रश्न उपस्थित केला आहे. अनुसूचित जातीच्या एका व्यक्तीची अधिकारी होण्याची संधी यानी हिरावून घेतली आहे. या लढाईला आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

तो दाखला खराच, माझ्या दाव्यावर मी ठाम

“जो जन्माचा दाखला मी शेअर केला आहे तो खरा आहे आणि मी त्या दाव्यावर ठाम आहे. दाऊद के वानखेडे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. त्यावर जर पाहिलं तर अतिरिक्त फेरबदल करण्याचं काम करण्यात आलं आहे. मुंबईत मुलांचे जन्मप्रमाणपत्र ऑनलाईन मिळतात. समीर वानखेडे यांच्या बहिणीचा दाखला ऑनलाईन उपलब्ध आहे. परंतु हा दाखला ऑनलाईन मिळत नाही आहे. आम्ही रजिस्टर तपासायला लावलं, दीड महिने आम्ही हे शोधत होतो. तेव्हा आम्हाला स्कॅन केलेले संगणकीय कागदपत्र आमच्या हाती लागले. मी माझ्या दाव्यावर कायम आहे. ज्ञानदेव वानखेडे हे जन्मापासून दलीत आहेत. दलीत कॅटेगरीमध्ये जो अकोला जिल्हा होता, नंतर वाशीम जिल्हा झाला तिथून त्यांनी हा दाखला मिळवला. त्या आधारावर त्यांनी नोकरी केली. मुंबईत देखील त्यांनी काम केलं आहे. माझगाव मध्ये घागरा इमारत आहे टँक बंदर रोडवर, तिथे त्यांनी दिवंगत झायदा खान यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर ते दाऊद खान बनले, दोन मुलांचा जन्म झाला. त्यानंतर पूर्ण कुटूंब मुस्लीम धर्माप्रमाणे जीवन जगत होते,” असा दावा नवाब मलिक यांनी केला.

“समीर वानखेडे यांनी वडिलांचा दाखल्याचा आधारावर स्वत:चा दाखला मिळवला. या संबंधित अनेक दलित संघटना माझ्याशी चर्चा करत आहेत. मी शेअर केलेलं जन्म प्रमाणपत्र खोटं असेल तर खरं कोणतं आहे हे वानखेडे परिवाराने किंवा समीर वानखेडे यांनी स्वत: समोर येऊन दाखवावं. त्यांचे वडील जातीचं प्रमाणपत्र दाखवत आहेत. त्यांनी समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र जाहीर करा,” असं आव्हान नवाब मलिक यांनी वानखेडे यांना दिलं.

First Published on: October 26, 2021 11:08 AM
Exit mobile version