गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून गावकऱ्याची निर्घृण हत्या

गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून गावकऱ्याची निर्घृण हत्या

गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ला

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यात महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी वाहने जाळपोळ आणि भुसुरुंग स्फोटानंतर नक्षलवादी आणखी हिंसक झाल्याचे दिसून येत आहे. भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी घडल्याचे उघडकीस आले आहे. मागील सहा दिवसांत ही तिसरी घटना असून ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली ती व्यक्ती पोलिसांचा खबरी असल्याचा संशय नक्षलवाद्यांना आला असून त्यातून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. डोंगा कोमटी वेडदा असे मृत व्यक्तीचे नाव असून तो नैनवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

गावकऱ्याची केली निर्घृण हत्या

भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ नैनवाडी येथे राहणारे रहिवासी डोंगा वेडदा हे लग्नसमारंभासाठी मर्दहूर येथे आले होते. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण करुन त्यांनी त्यांची हत्या केली आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाल्यापासून नक्षलवादी हिंसक कारवाया करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलीस विभाग नक्षलविरोधी अभियान राबवित आहे, असे असतानाही महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे रस्ता कामावरील वाहनांना पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर जांभुळखेडा गावाजवळ भुसुरूंग स्फोट घडवून आणला. यात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. तसेच खासगी वाहनचालक ठार झाला होता. या घटनांमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


वाचा – गडचिरोलीतील हल्ल्याप्रकरणी मिलिंद तेलतुंबडेंवर गुन्हा दाखल


 

First Published on: May 5, 2019 6:39 PM
Exit mobile version