घरमहाराष्ट्रगडचिरोलीतील हल्ल्याप्रकरणी मिलिंद तेलतुंबडेंवर गुन्हा दाखल

गडचिरोलीतील हल्ल्याप्रकरणी मिलिंद तेलतुंबडेंवर गुन्हा दाखल

Subscribe

गडचिरोलीतील कुरखेडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोलीतील कुरखेडा येथे महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी झालेल्या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर आता या प्रकरणातही मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या २१ सदस्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवार, १ मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये १५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर शनिवारी, ४ मे नक्षलवाद्यांविरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या २१ सदस्यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.

नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचा बदला 

जांभूरखेडा येथे सी-६० कमांडो जवानांचे वाहन जात असताना नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात एक चालक आणि १५ जवान शहीद झाले आहेत. या स्फोटात कमांडोंच्या गाडीचे अक्षरश: तुकडेतुकडे झाले. दरम्यान, माओवाद्यांनी केलेला हा हल्ला गेल्या वर्षीच्या नक्षलवाद्यांच्याविरोधात केलेल्या कारवाईचा बदला घेण्यासाठी करण्यात आला, असे समजते. गेल्या वर्षी गडचिरोलीमध्येच नक्षलवादविरोधी कारवाईमध्ये १६ नक्षलवादी मारले गेले होते. २२ एप्रिल २०१८ ला एटापल्लीमध्ये माओवादविरोधी पथकाने ही कारवाई तीव्र केली होती. बोरियाच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत हे नक्षलवादी ठार झाले होते. महाराष्ट्रात गेल्या ४० वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई होती. नक्षलवाद्यांनी या कारवाईचा बदला घेण्यासाठीच गडचिरोलीमध्ये हा हल्ला घडवला, याला गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनीही दुजोरा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -