NCB ने राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीलाही सोडलं, फडणवीसांची नवाब मलिकांच्या आरोपावर प्रतिक्रिया

NCB ने राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीलाही सोडलं, फडणवीसांची नवाब मलिकांच्या आरोपावर प्रतिक्रिया

धनशक्ती सत्तेचा गैरवापर केला तरी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईमध्ये भाजपमधील नेत्याच्या मेव्हण्याला सोडल असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. एनसीबीने क्रूझवर ड्रग्ज प्रकरणात कारवाई केली. या कारवाईमध्ये जे क्लीन होते त्यांना सोडलं आहे. यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा जवळचा व्यक्ती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा व्यक्ती कोण आहे? अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच एनसीबी चांगले काम करत आहे त्यामुळे राजकारण न करता एनसीबीच्या कारवाईला पाठिंबा दिला पाहिजे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांचे दुखणे वेगळं असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच एनसीबीने स्पष्ट सांगितले आहे की, त्यांनी अनेक लोकांना कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात पकडले आहे. ज्यांच्याकडे काही सापडलं नाही अशा लोकांना एनसीबीने कारवाईदरम्यान सोडलं आणि ज्यांच्याकडे ड्रग्ज सापडले त्यांना अटक करण्यात आलं आहे. ड्रग्ज समाजाला लागलेली कीड आहे. ड्रग्जविरोधात एखादी यंत्रणा काम करत असेल तर त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. हा एखाद्या पक्षाचा प्रश्न नाही तर हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एनसीबीच्या कारवाईचे राजकारण

एनसीबीच्या कारवाईचे राजकारण करण्यात येत आहे. ज्या लोकांना एनसीबीने सोडलं आहे त्यांच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा निकटवर्तीय आहे. तो माणुस क्लिन होता त्यामुळे त्याला सोडण्यात आले आहे. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन बदनाम करणं अयोग्य आहे. एनसीबीने केवळ ते लोकं क्लीन असल्यामुले सोडलं आहे त्यामुळे कोणत्या पक्षाते होते म्हणून सोडलं? हा मुद्दा येत नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्याच्या मेव्हण्याला सोडलं – नवाब मलिक

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने सुरूवातीला ८ ते १० जणांना ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. पण प्रत्यक्षात याठिकाणी ११ जण होते. त्यापैकी एनसीबीने ३ जणांना सोडून दिले आहे. यामध्ये एक जण भाजप नेत्याचा मेव्हणा आहे. भाजपच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी फोन केल्यानेच तिघांना सोडण्यात आले असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तिघांना सोडण्यात आलेल्यांपैकी एक रिषभ सचदेवा हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिलेल्या मोहित भारतीयचे मेव्हणे आहेत. रिषभ सचदेवाचे मित्र असल्यानेच आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा सोडण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. एनसीबीचे समीर वानखेडे यांच्याही कॉल रेकॉर्डची चौकशी करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.


हेही वाचा : नवाब मलिकांचा ‘त्या’ भाजप नेत्याच्या मेहुण्याबाबतचा गौप्यस्फोट


 

First Published on: October 9, 2021 8:34 PM
Exit mobile version