‘मला त्यात अजिबात रस नाही…’; युपीएच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान

‘मला त्यात अजिबात रस नाही…’; युपीएच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्ष होण्यावर चर्चा रंगली आहे. मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळं युपीएचे अध्यक्षपद शरद पवार स्विकारणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. मात्र, रविवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ‘ती जबाबदारी मी घेणार नाही’, असं म्हणत या चर्चेला पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे.

“मी नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्यात पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे”, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

“विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हणतात त्यावेळी काही वास्तव गोष्टी दुलर्क्ष करुन चालणार नाहीत. ममता बॅनर्जींचा अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे. सत्ता असून लोकांचा पाठिंबा आहे. इतर सर्व पक्षांचीही राज्या राज्यांमध्ये शक्तीकेंद्र आहेत. पण काँग्रेस एक असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात आहे. आज त्यांची सत्ता नसेल पण काँग्रेस कार्यकर्ता देशाच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात, गावात पहायला मिळतोय. त्यामुळे पर्यायी काही करायचं असेल तर ज्या पक्षाचा वेस व्यापक आहे त्याला घेऊन करणं वास्तव्याला धरुन होईल. तसा विचार वेगवेगळ्या पक्षातील लोक करत असतील तर त्याच्यातून काही निर्णय येण्याची शक्यता आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएचा सातबारा काँग्रेस आणि गांधी घराण्याकडे असून तो बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. यावर ही शरद पवार यांनी “त्यांचं मत हे माझं मत असं नाही”, असं म्हटलं.


हेही वाचा – महागाई विरोधात युवासेनेचे ‘थाली बजाओ’ आंदोलन

First Published on: April 3, 2022 12:22 PM
Exit mobile version