‘रेवडीवर खेळणारा बारका पैलवान सुद्धा तुम्हाला चीतपट करेल’

‘रेवडीवर खेळणारा बारका पैलवान सुद्धा तुम्हाला चीतपट करेल’

“मी १४ निवडणूका लढल्या आणि जिंकल्यासुद्धा त्यामुळे मैदान सोडून मी पळणारा नाही. उध्दव ठाकरे तुम्ही एकदा मैदानात उतरुन दाखवा. मी उतरण्याची गरजच पडणार नाही, माझे पैलवानच तुम्हाला भारी पडतील”, असे जबरदस्त आणि थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना मंचर येथील जाहीर सभेत दिले. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची मंचर येथे विराट अशी सभा काल सायंकाळी पार पडली.

उध्दव ठाकरेंनी मैदानाबाबत बोलू नये. ज्यांनी कधी मैदान पाहिले नाही त्यांच्या तोंडी मैदानाची भाषा शोभत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतला. “यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागलीच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री आणि यांनी कधी शेतकऱ्यांसाठी काम केले नाही. कामगारांसाठी काम केले नाही. फक्त सत्ता हातात घेतली आणि त्या सत्तेचा काय भरण्यासाठी वापर केला ते मी जाहीर बोलू इच्छीत नाही”, असेही शरद पवार म्हणाले.

“गप्पा मारणारे बरेच लोक इथे आहेत. पुण्यात विमानतळ झाले असते तर आज खुप काही झाले असते. शेतमाल थेट परदेशी गेला असता. परंतु या भागातील खासदारांनी त्याला विरोध केला. खासदारांच्या दुटप्पी भूमिकेमुळे विमानतळ झाले नाही. हे असे खासदार आपल्याला हवेत तरी कशाला? असा सवाल करतानाच आम्ही अमोल कोल्हे यांना यासाठीच उमेदवारी जाहीर केली. अमोल कोल्हे यांनी या भागाच्या विकासासाठी खूप स्वप्न बघितली आहेत. ती स्वप्न साकार करण्यासाठी अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवा”, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

या सभेत संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड, उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आपले विचार मांडले. यावेळी शिरुर, खेड येथील शिवसेना- भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

First Published on: April 26, 2019 8:35 AM
Exit mobile version