अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नगरसेवकाचा राजीनामा

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नगरसेवकाचा राजीनामा

राष्ट्रवादी नगरसेवक संजोग वाघेरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ईडीमध्ये नाव आल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचीच चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या दिवसभराच्या घडामोडीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावण्यात आले. त्याच दरम्यान, पिंपरीचिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी देखील आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. या नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा संदर्भातील पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

हे आहेत ते नगरसेवक

मार्गदर्शक जिथे नाहीत, तिथे आम्ही तरी का थांबायचे?’, असे म्हणत पिंपरीचिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भातील पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. शुक्रवारी अचानक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. ‘अजित पवार यांचे बारामती पाठोपाठ पिंपरीचिंचवड शहरावर अतोनात प्रेम आहे. त्याप्रमाणे शहराचा विकास देखील केला. यामुळे अनेक कार्यकर्ते आणि नेते जोडले गेले‘, असे त्यांनी राजीनामा संदर्भात लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

या राजीनामावर शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे विचार करत असून नगरसेवक शेख यांनी समजूत काढणार असल्याचे ते म्हणाले आहेत. आज काही वेळानंतर पक्ष कार्यलय किंवा इतर ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. यात शहरातील सर्वच महत्वाचे कार्यकर्ते, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नेमकी बैठक कशासाठी आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.


हेही वाचा – शरद पवारांचं नाव गोवल्यामुळे व्यथित होऊन राजीनामा दिला – अजित पवार


First Published on: September 28, 2019 6:19 PM
Exit mobile version