मराठा पाठोपाठ धनगर आणि मुस्लिम आरक्षाणासाठीही राष्ट्रवादी आग्रही

मराठा पाठोपाठ धनगर आणि मुस्लिम आरक्षाणासाठीही राष्ट्रवादी आग्रही

बैठकी दरम्यानचा फोटो

मराठा आरक्षणा पाठोपाठ आता धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही झाले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या बैठकीत धनगर आणि मुस्लिम समाजाला ही आरक्षण मिळावे अशी चर्चा झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार, आणि आमदार उपस्तिथ होते. या बैठकीत धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे यासंदर्भात चर्चा झाली असून, याबाबत संध्याकाळी पाच वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काँग्रेसने ही केली होती. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची ही मागणी मान्य केली असून मागास आयोगाचा अहवाल आल्यांनतर विशेष अधिवेशन घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अजित पवार , छगन भुजबळ ,दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे परिषदेतील आणि विधानसभेतील आमदार उपस्तिथ होते. सरकारने लवकरात लवकर मागास आयोगाचा अहवाल घ्यावा, तसेच विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासह धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचाही सरकारने प्रश्न निकाली लावावा अशी मागणी यावेळी केली असल्याचे मलिक यांनी म्हटले.

भाजपने निवडणुकीपूर्वी मराठा आणि धनगर समाजाला तात्काळ आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. भाजपाला सत्तेत येऊन आता चार वर्ष होत आहेत. इतक्या वर्षात या सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर गांभीर्याने भूमिका घेतली नसल्यानेच आंदोलन पेटले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: July 30, 2018 5:14 PM
Exit mobile version