वाचाळवीरांना आवारा! मंगलप्रभात लोढांच्या विधानावर अजित पवार संतापले

वाचाळवीरांना आवारा! मंगलप्रभात लोढांच्या विधानावर अजित पवार संतापले

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले होते. हे वातावरण शांत होत नाही तोवर आता भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. लोढा यांनी शिंदे गटाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. ज्यावरून विरोधकांना त्यांचा वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. यात राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तर या वाचाळवीरांना आवरा असा सल्ला शिंदे फडणवीस सरकारला दिला आहेत. तसेच लोढांना त्यांच्या वक्तव्याप्रकरणी चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

अजित पवार म्हणाले की, वाचाळवीरांना आवारा असं सातत्याने आम्ही सांगतोय तरी देखील त्यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना येतात. हे बोलायला एक जातात परंतु त्याच्यातून अर्थ वेगळा निघतो. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा आपल्याला ठेच लागणार नाही असे प्रयत्न करतो. मात्र यांच्यात तर हे दिसतच नाही, उलट चढाओढ लागली आहे.

एक चूकला की लगेच दुसरा चूक करतो, मग तिसरा. हे कधी थांबणार मला कळतच नाही. एकनाथ शिंदे स्टेजवर असताना त्यांच्यासमोरच तुलना केली. आपण शिवरायांची कुणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्यावर जबाबदारी काय, आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाही होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? हे देखील यांना कळत नाही. राज्यातील तमाम जनता यांना पाहत आहे. एकदा निवडणुका लागू द्या मग यांना कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?

आज साताऱ्यातील 364 व्या शिवप्रताप दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार महेश शिंदे उपस्थित होते. यावेळी सोहळ्याला संबोधित करताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगाजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा कैद करून ठेवले होते. त्यावेळी शिवाजी महाराज हे स्वत: साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी युक्ती करून बादशाहावर हातावर तुरी देत तिथून निसटले. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच सुटका करून घेतली. लोढांच्या या वक्तव्यावर आता शिवप्रेमींसह अनेक राजकीय नेत्यांनी देखील टीकास्त्र डागले आहे.


पंतप्रधान मोदींचा 11 डिसेंबरला महाराष्ट्र दौरा; या दोन मोठ्या प्रकल्पांचे करणार उद्धाटन

First Published on: November 30, 2022 6:16 PM
Exit mobile version