कोळसा संपेपर्यंत सरकार झोपा काढत होते का? अजित पवारांचा सवाल

कोळसा संपेपर्यंत सरकार झोपा काढत होते का? अजित पवारांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसची 'संविधान बचाव, देश बचाव' मोहीम

मराठवाड्यात भारनियमनाचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. आघाडी सरकार असताना आम्ही राज्याला भारनियमनमुक्त करू असा निर्धार करत राज्य भारनियमनमुक्त केले. मात्र आत्ताचे सरकार तसे करताना दिसत नाही. यांना कोळसा आणता येत नाही का? हे काय झोपा काढण्यासाठी आहेत का? असा सवाल अजित पवार यांना केला आहे.

औरंगाबादमध्ये ‘संविधान बचाव, देश बचाव’ मोहिमेच्या आंदोलनामध्ये मार्गदर्शन करताना अजितदादा पवार यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. ‘संविधान बचाव, देश बचाव’ ही मोहीम आज काळाची गरज होवून बसली असून संविधानाबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे, असा आरोप अजितदादा यांनी केला. संभाजी भिडे संतांपेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असे सांगतात. भेदभाव पसरवणाऱ्या मनुस्मृतीला जपण्यासाठी पुढाकार का घेतला जात आहे? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.

एका तरी मुलीला हात लावा, होत्याचं नव्हतं करेन

मराठवाडा हे नारीशक्तीचे शक्तीपीठ आहे. मात्र इथेच महिलांवर जास्त अन्याय अत्याचार होत आहे. प्रत्येक दिवशी महिलाची हत्या, महिलांवरील अत्याचार अशा बातम्या वाचायला मिळतात. सरकारने ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. जेणेकरून कुणालाही महिलेकडे डोळे वर करून पाहण्याची हिम्मत करता येणार नाही. कायदा कडक करायला हवा त्यासाठी आम्ही सरकारला सहकार्य करू असे आश्वासन अजितदादांनी सरकारला दिले. भाजपचे पदाधिकारी असलेले मधु चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राम कदम यांनी मुलींना उचलून आणण्याची भाषा केली. “राम कदम यांनी एकाही मुलीला हात लावावा… होत्याचं नव्हते करेन” असा सज्जड दम भरतानाच सत्तेची नशा चढली आहे का ? फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात अशी भाषा कोणी वापरली नव्हती. आपण जागृत झाले पाहिजे असे आवाहनही दादांनी केले.

देशाच्या संविधानाला धक्का लागू देणार नाही – खा. सुप्रिया सुळे

देशाचे संविधान आम्ही कुणालाही बदलू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस तसे कधीही होवू देणार नाही. शरद पवार, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आम्ही सगळे आजपर्यंत केवळ संविधानावरच हात ठेवून पदाची शपथ घेतो. त्यामुळे या संविधानाला धक्का लागू देणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
राज्यातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्री कुणीही महिला-मुलींबाबत अपमानास्पद बोलले तर सुप्रिया सुळे कदापीही सहन करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.

तर मोदी २०२२ साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील – धनंजय मुंडे

डॉ. ए.पी.जे. कलाम हे २०२० साली भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत होते, मात्र सध्याचे सरकार २०२२ साली संपूर्ण संविधानच बदलून टाकण्याचे स्वप्न पाहत आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आयोजित संविधान बचाव परिषदेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशाची वाटचाल योग्य रितीने चालली होता. मात्र आज या संविधानावर घाला घातला जात आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर २०२२ साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली.

First Published on: October 9, 2018 9:18 PM
Exit mobile version