राष्ट्रवादीला नवा धक्का; अजून एक आमदार शिवसेनेत!

राष्ट्रवादीला नवा धक्का; अजून एक आमदार शिवसेनेत!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप किंवा शिवसेनेत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आता आणखीन एक नाव जोडलं गेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापुरच्या बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिलीप सोपल पक्षाला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. सोमवारी सकाळी दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं. मंगळवारी सकाळी विधानसभा अध्यक्षांकडे सदस्यत्वाचा राजीनामा सोपवून दिलीप सोपल येत्या बुधवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिलीप सोपल

राजेंद्र राऊतांमुळे शिवसेना प्रवेश लांबला?

दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रवेश गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असल्याचं सांगितलं जात होतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोपल यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेलेल माजी आमदार राजेंद्र राऊत. राऊत यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सोपल यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्या पार्श्वभूमीवर सोपल यांनी लागलीच पक्षांतराचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. बार्शीमध्येच एका कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सोपल यांनी शिवसेना प्रवेशासंदर्भात संकेत दिले होते.


वाचा सविस्तर – होय, भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंशी तासभर चर्चा!

भास्कर जाधवही शिवसेनेत जाणार!

दरम्यान, एकीकडे दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा हात सोडला असतानाच आता भास्कर जाधव हे राष्ट्रवादीचे कोकणातील नेते देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर जाऊन तब्बल तासभर चर्चा केली. यामध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, छगन भुजबळ देखील शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक असून त्यांना शिवसेनेतूनच विरोध होत असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

First Published on: August 26, 2019 12:44 PM
Exit mobile version