घरमहाराष्ट्रहोय, भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंशी तासभर चर्चा! पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी?

होय, भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंशी तासभर चर्चा! पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचा कोकणातला मोठा चेहरा असणारे भास्कर जाधव लवकरच पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षांतरं होताना राज्यातली जनता पाहात आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक पक्षांतरं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये होत आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या आधीच विरोधकांची ताकद हळूहळू कमी होऊ लागली आहे. या पक्षांतराचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसत असून पक्षाचे अनेक मोठे चेहेरे भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या रुपाने पक्षाला मुंबईत मोठा फटका बसला आहे. मात्र, आता त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील मोठा चेहरा असलेले भास्कर जाधव हे देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. रविवारी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत तब्बल तासभर चर्चा केली. त्यामुळे भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश पक्का मानला जात आहे. येत्या आठवड्याभरात ते शिवबंधन हातावर बांधतील अशी चर्चा आहे.

छगन भुजबळांना शिवसेनेतून विरोध

रविवारी दिवसभर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पक्षांतराविषयी चर्चा सुरू होती. पक्षाचे आक्रमक नेते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक छगन भुजबळ शिवसेनेमध्ये जाण्यासाठी प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांना नाशिकमधल्याच काही स्थानिक शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचं सूत्रांकडून समजत आहे. त्यानंतर आता भास्कर जाधवांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याबद्दल सुरुवातीला गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, सोमवारी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्येच त्यांच्या भेटीच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. जयदत्त क्षिरसागर, सचिन अहिर यांच्या पाठोपाठ भास्कर जाधव यांनी देखील पक्षांतराचा निर्णय घेतला, तर राष्ट्रवादीला हा मोठा फटका मानला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बोईसरचे आमदार विलास तरे शिवसेनेत!

विलास तरेंचं केलं अभिनंदन

दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी रविवारीच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावर भास्कर जाधव यांनी मातोश्री भेटीदरम्यान त्यांचं अभिनंदन देखील केल्याचं सांगितलं जात आहे. भास्कर जाधव यांच्याप्रमाणेच संजय पाटील हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून ‘उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे’, अशी टीका त्यांनी केली होती. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान देखील अमोल कोल्हे, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील या त्रिकुटाकडून पक्षांतर करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींचा समाचार घेतला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -