शरद पवारांचं निमंत्रण, अमित शहा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार?

शरद पवारांचं निमंत्रण, अमित शहा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकारमंत्री अमित शहा यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी असं निमंत्रण दिलं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांचं निमंत्रण स्वीकारुन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार का? हे पाहण महत्त्वाचं असणार आहे.

शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी बोलताना अमित शहा यांनी शरद पवार यांना पुण्याच्या वैकुंठभाई मेहता संस्थेला भेट देणार असल्याचं सांगितलं. त्यावर शरद पवार यांनी पुण्याला येतच आहात तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी असं निमंत्रण दिलं. त्यावर अमित शहा यांनी सकृत दर्शनी होकार दर्शवला आहे. शिवाय, साखर महासंघाचे पदाधिकारी देखील तिथे उपस्थित होते. त्यांनी देखील विनंती केली की पुण्यातील एका साखर कारखान्याला भेट द्यावी. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही सहकार क्षेत्रातील देशातील सर्वात महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे अमित शहा या संस्थेला भेट देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

अमित शहा-शरद पवार भेट

शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांची भेट घेतली होती. शहा यांच्याकडे सहकार खाते आल्याने सहकार खात्याशी संबंधित मुद्द्यांबाबत ही भेट होती. त्यात महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवरही चर्चा झाल्याचं समजतं. पवारांनी गेल्याच महिन्यात १७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच ३ ऑगस्ट रोजी शहांची भेट घेतली. खरंतर अमित शहा आणि शरद पवार भेट दुर्मिळ होती. मोदी-पवार यांची जशी केमिस्ट्री आहे तशी पवार-शहा यांची नाही आहे. पण आता साखर उद्योगाचे प्रश्न अमित शहा यांच्याकडे जाणार असल्याने या भेटीच्या निमित्ताने या दोन नेत्यांमध्ये नव्याने साखर पेरणी होते का? हे बघण महत्त्वाचं असणार आहे.

 

First Published on: August 5, 2021 11:31 AM
Exit mobile version