सत्तालोलुपता प्रिय असणाऱ्याच्या हाती राज्याच्या आरोग्याची जबाबदारी, राष्ट्रवादीचा तानाजी सांवतांवर घणाघात

सत्तालोलुपता प्रिय असणाऱ्याच्या हाती राज्याच्या आरोग्याची जबाबदारी, राष्ट्रवादीचा तानाजी सांवतांवर घणाघात

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच आम्ही बंडखोरी केली, असा मोठा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंज होता तुम्ही फडणवीसांसोबत बैठका घेत होतात, महाराष्ट्राच्या जनतेचे दुर्दैव ते अजून काय असावे? असा घणाघात राष्ट्रवादीने ट्वीटच्या मार्फत केले आहे.

हेही वाचा – राज्यातील सत्तांतराबाबत तानाजी सावंतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, फडणवीसांच्या आदेशाने…

राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून तानाजी सावंत यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तानाजी सावंत बंडखोरी आणि सत्तांतराविषयी सांगत आहेत. यावरून राष्ट्रवादीने ट्वीट केलं आहे की, वाह रे आरोग्यमंत्री… जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंजत होता आणि मविआ सरकार कोरोनावर मात करण्यासाठी लढत होते, सर्वसामान्यांना उपचार मिळावेत, लसीकरण व्हावे, रोगाचे निर्मूलन व्हावे म्हणून काम करत होते, तेव्हा तुम्ही तत्कालिन सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने बंड करण्याची, सरकार पाडण्याची आणि राज्यात अस्थिरता आणण्याची खलबतं करत होतात. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका घेत होतात. ज्यांना राज्य एका महाभयंकर रोगाचा सामना करत असतानाही सत्तालोलुपता जास्त प्रिय वाटते, त्यांच्याकडे आज राज्याच्या आरोग्याची जबाबदारी ईडी सरकारने टाकली आहे यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे दुर्दैव ते अजून काय असावे?

तानाजी सावंत काय म्हणाले होते?

“सरकार सत्तेत आल्यानंतर ३० डिसेंबर २०१९ ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ३ जानेवारी २०२० च्या आसपास सुजितसिंह ठाकूर आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली. धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना-भाजपची, जे साडेबारा कोटी जनतेने मँडेट दिलं होतं, ती सुरुवात या ठिकाणाहून केली, ही वस्तुस्थिती आहे. त्या वेळी बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. मी तेवढ्यापुरता थांबलेलो नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात करून सांगितलं, की परत या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही, तानाजी सावंत म्हणाले. तसंच, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्यात तब्बल १०० ते १५० बैठका झाल्याचाही गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी यावेळी केला.

First Published on: March 29, 2023 1:28 PM
Exit mobile version